मृत्यू नंतरही हालअपेष्टा,रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला. ★ आरोग्य विभागाचे रुग्णावर दुर्लक्ष ; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.

मृत्यू नंतरही हालअपेष्टा,रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला.


★ आरोग्य विभागाचे रुग्णावर दुर्लक्ष ; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.१७ जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते.२० जुलैला उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.


देशात क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम चालविण्यात येत आहे.यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो.निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे.वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो.मात्र,गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला. इतकेच नव्हे तर मृत्यू नंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचे प्रेत दुचाकी वरून नेण्यात आले.


हा प्रकार लक्षात येताच खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.पण तोपर्यंत प्रेत गावात पोहोचले होते. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी तो रुग्ण कृष्णारचा रहिवासी असला तरी त्याच्यावर पेरमीली येथे उपचार सुरू होते असे सांगितले.या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.पण जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग झोपेत होते काय असा प्रश्न नागरिकांमधून विचारल्या जात आहे.


सदर प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही.त्यामुळे मी क्षयरोग अधिकाऱ्यांना यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे.माहिती येताच पुढील कार्यवाही करू. - डॉ.दावल साळवे,जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !