सीमेवरील जवानांमुळेच आपण सुरक्षित. - अपर जिल्हाधिकारी देशपांडे ★ सैनिक कल्याण कार्यालयातर्फे कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळावा.

सीमेवरील जवानांमुळेच आपण सुरक्षित. - अपर जिल्हाधिकारी देशपांडे


★ सैनिक कल्याण कार्यालयातर्फे कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळावा.


एस.के 24 तास


चंद्रपूर :  ऊन,पाऊस,थंडी,वारा, वादळ आणि हिमवर्षाव अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले सैनिक सीमेवर कर्तव्य बजावत असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.


माजी सैनिक कल्याण बहुउद्देशीय संस्था आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव (चंद्रपूर) येथे धनोजे कुणबी समाज मंदिरात कारगील विजय दिवस व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.मंचावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे, सुखविंदरसिंह सुहाना,कामठी येथील लेफ्टीनेंट कर्नल माणिक पनवर,मेजर अमोद धागे,मेजर पपिंदर सिंग,सुनिता लोढिया आदी उपस्थित होते.

सन 1999 मध्ये भारतीय जवानांच्या शुर पराक्रमामुळे आपण कारगील युध्द जिंकलो, असे सांगून श्रीकांत देशपांडे म्हणाले,त्या शूरगाथेच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात यासाठी दरवर्षी 26 जुलै हा कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच आपल्या शूर सैनिकांनी गाजविलेल्या पराक्रमाची उजळणी अशा कार्यक्रमांमधून व्हावी, हासुध्दा या आयोजनामागचा हेतु आहे. हवामानाच्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याकरीता आपले सैनिक 24 तास तैनात असतात. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहो. या सैनिकांप्रती प्रत्येक भारतीयांच्या मनात आदरभाव कायम राहावा, तरुणांनी या गोष्टीचे स्मरण करावे, असे आवाहनही श्रीकांत देशपांडे यांनी केले.


यावेळी निवृत्त कॅप्टन श्री.लिमसे म्हणाले, कारगीलचा पराक्रम आणि शहिदांचे बलिदान आपण कधीच विसरु शकत नाही. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपण कारगील जिंकले. भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला नेहमीच सलाम आहे. भारतीय सैनिक उणे 40 अंश तापमानात तैनात असतो. केवळ शस्त्रुसोबतच नाही तर हवामानाशीसुध्दा तो लढत असतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनिता लोढीया यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हरीश गाडे म्हणाले, एकीकडे कारगील विजय दिवसाचा आनंद असतो तर दुसरीकडे यात शहीद झालेल्या जवानांबद्दल दु:ख वाटते. कारगील युध्द हे 45 दिवस सुरू होते. यात आपले 550 जवान शहीद तर दीड हजारांच्यावर जखमी झाले, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व उपस्थितांनी दोन मिनीटे उभे राहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवृत्त सुभेदार शंकर मेंगरे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इको-प्रो चे बंडू धोत्रे आणि त्यांची टीम तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त परिचारीका पुष्पा पोडे, स्नेहा उंबरकर, नुमय शेंडे आणि चैतन्य चहांदे या विद्यार्थ्यांचासुध्दा सन्मान करण्यात आला.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !