राष्ट्रपती महोदया गडचिरोली नगुरुते निवा सेवामान मंत.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठातील १० व्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ५ जुलै रोजी शहरात येत आहेत. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कार्यक्रमस्थळासह शहरभर रंगरंगोटी, गुळगुळीत रस्ते बनविण्यात आले आहे.
नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तसेच राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत राष्ट्रपती येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आदिवासी समुहातीलच द्रौपदी मुर्मू या जिल्ह्यात येत असल्याने या दौऱ्याची उत्सुकता आहे. दरम्यान, आदिवासी गोंडी भाषेत 'राष्ट्रपती महोदया, गडचिरोली नगुरूते निवा सेवामान मंता म्हणजे,महामहीम राष्ट्रपती गडचिरोली शहरात आपले स्वागत आहे.. अशीच काहीशी जिल्हासीयांची भावना आहे.
राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,मंत्री चंद्रकांत पाटील ४ जुलैला नागपुरात दाखल झाले.सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारीच गडचिरोलीतील चारही मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. शहरात सर्वत्र पोलिस व प्रशासकीय वाहनांची रेलचेल दिसून आली.
असा राहणार दौरा...
सकाळी दहा वाजता नागपूरहून हेलिकॉप्टरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शहरात दाखल होतील. साडेदहा वाजता राष्ट्रपतीचे विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळी आगमन होईल. याच कार्यक्रमात त्या नागपूर मार्गावरील गोगाव (अडपल्ली) येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नियोजित कॅम्पस इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण अभासी पध्दतीने (रिमोटद्वारे) करणार आहेत. त्यानंतर पावणेबारा वाजता त्या पुन्हा नागपूरला हेलिकॉप्टरने रवाना होतील.
कोटगल टी-पॉइंट ते कोर्ट टी- पॉइंट दिवसभर बंद राहणार
★ राष्ट्रपती व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कोटगल टी- पॉइंट ते कोर्ट टी-पॉइंट हा मार्ग ५ जुलै रोजी पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सामान्य नागरिकांनी याऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान,या मार्गावरील सर्व दुकाने देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी करूनच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.