वाघाची शिकार,११ आरोपींना अटक.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गोंदिया : छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्हा वनविभागाने ७ जुलैला बिजापूर येथे वाघाच्या कातडीसह काही आरोपींना अटक केली होती. याप्रकरणाच्या सखोल तपासानंतर आणखी वीस जणांना अटक करण्यात आली.आरोपींनी वाघाची कातडी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून आणल्याची कबुली दिल्यानंतर सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे.या जंगलांमध्ये वाघांसह इतर अनेक प्राण्यांचा वावर आहे.यामुळे वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी करणाऱ्या टोळ्याही येथे सक्रिय आहेत.यापैकी एका टोळीने सालेकसा जंगलातून वाघाची शिकार केली आणि त्याची कातडी, नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील सीआरपीएफच्या पोलीस उपनिरीक्षक अमित झा आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांना विकले.
वनविभागाने चौकशी केली असता,शालिक मरकाम (५५, रा.कोसाटोला),सुरज मरकाम (४५, रा.कोसाटोला),जियाराम मरकाम (४२, रा. नवाटोला, सालेकसा) या तिघांनी मिळून विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची कबुली दिली.
यानंतर वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या गेदलाल भोयर (५५,रा.लभानधारणी), तुकाराम बघेले (५९, रा.भाडीपार),अंगराज कटरे (६७, रा. दरबडा),वामन फुंडे (६०,रा.सिंधीटोला), शामराव शिवनकर (५३),जितेंद्र पंडित,यादवराव पंधरे,अशोक खोटेले,अशा एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.