भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नागरिकांसाठी मंगळवार ते रविवार खुले,सोमवारी बंद. ★ मागील दीड वर्षात 589 दिवसांत 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी दिली भेट.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नागरिकांसाठी मंगळवार ते रविवार खुले,सोमवारी बंद.


★ मागील दीड वर्षात 589 दिवसांत 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी दिली भेट.


एस.के.24 तास                                                  नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे


नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथे ऐरोली – मुलुंड खाडीपूलानजिक उभारण्यात आलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा जागर करणारे ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात आहे.


देशापरदेशातील बाबासाहेबांच्या विविध स्मारकांमध्ये या स्मारकाचे वेगळेपण स्मारकाला भेट देणा-या प्रत्येक मान्यवर व्यक्तीने आवर्जून सांगितले असून लक्षावधी नागरिकांनी याठिकाणी भेट देत येथील सुविधांचे कौतुक केले आहे. 


याठिकाणी आधुनिक ई लायब्ररी सुविधेसह असलेले सुसज्ज ग्रंथालय, बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविणारे दुर्मीळ छायाचित्र दालन, बाबासाहेबांच्या भाषणाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे होलोग्राफीक प्रेझेन्टेशन, भव्य ध्यानगृह (मेडिटेशन सेंटर), अत्याधुनिक सभागृह अशा अत्युत्तम सुविधांव्दारे या स्मारकाने मागील दीड वर्षात लोकांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण केलेले आहे. येथे येणारा प्रत्येक माणूस भारावून गेलेला आहे आणि प्रत्येकाने आपल्या संपर्कात येणा-या अनेक जणांना या स्मारकाला आवर्जून भेट द्या असे आग्रहाने सांगितले आहे.


भारतरत्न डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला 5 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील सुविधांचे लोकार्पण होऊन स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून मागील 1 वर्ष 7 महिने 10 दिवसांच्या कालावधीत म्हणजेच 589 दिवसात या स्मारकाला 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी नोंद करून भेट दिलेली आहे. विशेषत्वाने शनिवार व रविवारी नागरिकांचा स्मारक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ असतो.


स्मारकामध्ये आत्तापर्यंत डॉ.नरेंद्र जाधव,डॉ. भालचंद्र मुणगेकर,डॉ. सुखदेव थोरात,डॉ.रावसाहेब कसबे,उत्तम कांबळे, गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, हरी नरके, नागराज मंजुळे, राहुल सोलापूरकर, डॉ. गणेश चंदनशिवे, अरविंद जगताप, योगीराज बागुल अशा अनेक मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांकरिता खुले असते. स्मारकाची देखभाल - दुरूस्ती व्यवस्थित रितीने होण्याकरिता यापुढील काळात आठवड्यातील 1 दिवस म्हणजेच सोमवारी स्मारक बंद असणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !