शा.औ.प्र.संस्थेत शैक्षणिक करिअर चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन
★ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या मागे लागून आपले आयुष्य वाया घालवू नये. - सुशिल बुजाडे
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कॅम्पस मध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहितीपर करिअर प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे.या प्रदर्शनीचे उद्घाटन सेवानिवृत्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशिल बुजाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते.
या प्रसंगी सुशिल बुजाडे म्हणाले की, सध्या माहितीचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया च्या मागे लागून आपले आयुष्य बरबाद करू नये. सारासार विचार करूनच करिअर निवडावे , असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेहंदळे म्हणाले की, प्रशिक्षणार्थ्यांनी या संस्थेत जे व्यवसाय कौशल्ये आत्मसात केलेली आहेत, त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा. स्वयंरोजगाराकडे वळावे, जेणेकरून स्वावलंबनासोबतच तुम्ही इतरांनाही मदतीचा हात देऊ शकता.
तसेच सदर करियर मार्गदर्शनपर चित्रप्रदर्शनी ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दर्शनी भागांमध्ये आयोजित करण्यात आलेली असून जिल्हातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घेऊन आपले करिअर निवडावे असे आवाहन त्यांनी केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक करिअर मार्गदर्शनपर चित्रप्रदर्शिनीच्या निर्मितीबाबत प्रकाश टाकला. कार्यक्रमास गटनिदेशक अमित शेंडे,जितेंद्र टोंगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन.गेडकर यांनी केले.
चित्र प्रदर्शनी उभारण्यासाठी निदेशक आसुटकर, लांडगे, मडावी,भोंगळे,रोडे, नाडमवार , लोनगाडगे आदींचे सहकार्य लाभले.हे करियर मार्गदर्शनपर चित्रप्रदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये नऊ जुलै पर्यंत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी व पालकांकरिता नि:शुल्क ठेवण्यात आलेली आहे.