तालुक्यात झालेल्या कोतवाल नियुक्त्या रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घ्या : प्रा.अतुल देशकर.

तालुक्यात झालेल्या कोतवाल नियुक्त्या रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घ्या : प्रा.अतुल देशकर.


★ पुन्हा परीक्षा न झाल्यास परीक्षार्थींसह उपोषणाला बसू माजी आमदार देशकरांचा प्रशासनाला इशारा.


अमरदीप लोखंडे - ब्रह्मपुरी


ब्रह्मपुरी : दिनांक,१९ /०६/२०२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील कोतवाल भर्ती संदर्भात १५ जून रोजी तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्या मार्फत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात  गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात १६ जून रोजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्या नंतर आज सोमवारी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी परीक्षार्थींसह उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची भेट घेऊन सदर कोतवाल भरती रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. या वेळी पुन्हा परीक्षा न घेतल्यास परीक्षार्थींसह उपोषणाला बसण्याचा इशारा माजी आमदार देशकर यांनी प्रशासनाला दिला आहे.


या संदर्भात विद्यार्थ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सदर गैरव्यवहाराबाबत माहिती दिली होती. या बाबत आज भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी मा. उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची भेट घेऊन या बाबत सविस्तर चर्चा केली. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर कोरा सोडला त्यांचीच वर्णी कोतवाल पदी लागल्याची बाब पुढे आली आहे. या संदर्भात वर्ग खोलीत असलेल्या परीक्षार्थींनी वेळीच आक्षेप घेतला होता परंतु त्यावर त्याक्षणी कोणतीही कारवाई झाली नाही. सोबतच प्रश्न पत्रिकेवर आधीच परीक्षार्थींचा अनु क्रमांक पेनाने लिहिण्यात आला होता जे की नियमांत बसत नाही. या व्यतिरिक्त प्रश्न पत्रिकेच्या पेटीचे सील आधीच तुटले होते. या सर्व बाबी लक्षात घेता कोतवाल भरतीच्या परीक्षेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे लक्षात येते. 


या सर्व बाबी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर ठेऊन सदर कोतवाल भर्ती रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी पं.स सभापती तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामलाल दोनाकडर, जिल्हा सचिव माणिक पा. थेरकर, राजेश्वर मगरे, शहर महमंत्री मनोज भूपाल, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, कृ.उ.बा.स चे संचालक तथा युवा मोर्चा तालुका महामंत्री प्रा. यशवंत आंबोरकर, युवा मोर्चा जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, विलास वाकुडकर, मेंडकीचे उपसरपंच सचिन गुरनुले, विद्यार्थी आघाडीचे ब्रह्मपुरी विधानसभा संयोजक तेजस दोनाडकर यांच्या सह परीक्षार्थीं शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.


कोतवाल नियुक्त्यांना स्थगिती देण्याचे मा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. - 


सदर सर्व प्रकार बघता चंद्रपूर मा. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कोतवाल नियुक्त्याना स्थगिती देण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात खासदार अशोक नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर व चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोन द्वारे चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियुक्त्याना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !