वंडर्स पार्क मधील घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्पर कारवाई करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांचे निर्देश.

वंडर्स पार्क मधील घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्पर कारवाई करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांचे निर्देश.


एस.के.24 तास


नवी मुंबई : प्रतिनिधी  (दशरथ कांबळे)नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्कच्या नूतनीकरणानंतर 1 जून पासून वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.‌ सध्या शालेय सुट्टीचे दिवस असल्यामुळे नागरिकांची आपल्या मुलांसह उत्साही गर्दी वंडर्स पार्कमध्ये बघायला मिळत आहे.


या ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या 7 राईड्सचा आनंद नागरिकांकडून घेतला जात असताना 3 जून 2023 रोजी, रात्री 8.30 च्या सुमारास त्यामधील स्काय स्विंगर या पाळणा स्वरूपातील राइडवर अपघात घडला व 6 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


वंडर्स पार्क येथील सातही राईड्स 1 जून रोजी  सुरू झाल्यापासून व्यवस्थित सुरू होत्या. वंडर्स पार्कचे परिचलन करणाऱ्या मे.अश्विनी कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या‌ंच्यामार्फत सर्व सातही राईड्सवर स्वतंत्र ऑपरेटरची व्यवस्था करण्यात असून टेक्निशियन मार्फत नियमीत तपासणीही करण्यात येत होती.


तथापि 3 जून रोजी टेक्निशियन मार्फत स्काय स्विंगर या राईडची तांत्रिक तपासणी सुरू असताना हा अपघात घडला. अशाप्रकारची दुर्दैवी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असून याची तत्परतेने सखोल चौकशी करावी व कारणे तपासून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


वंडर्स पार्क पावसाळा कालावधीसाठी अंदाजे १५ जूनपासून बंद राहणार असल्याने, मुलांच्या सुट्टीचा कालावधी लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले राहणार असून त्यामधील केवळ स्काय स्विंगर ही राइड या कालावधीत बंद असणार आहे. वंडर्स पार्क मधील नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत अधिक दक्ष राहण्याचे काटेकोर निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !