गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता मजुरीच्या आड कंत्राटदार काळ्याचे पांढरे तर करीत नाही ना.? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकट करणारा तेंदुपानाचा हंगाम सद्या सुरू आहे.परंतु मजुरीच्या स्वरूपात कंत्राटदाराकडून नुकतीच बंद करण्यात आलेली दोन हजाराची नोट देण्यात येत असल्याने आदिवासींना ती जमा करण्यासाठी तालुक्याला चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे तेंदु मजुरीच्या आड कंत्राटदार काळ्याचे पांढरे तर करीत नाही ना,अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
दुसरीकडे याच संदर्भात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारने नुकतीच दोन हजाराची नोट बंद केली. ज्यांच्याकडे दोन हजाराची नोट असेल त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे काळेधन साठवून ठेवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू कंत्राटदारांनी यावर तोडगा काढल्याचे चित्र असून त्यानी तेंदुपाने गोळा करणाऱ्या मजुरांना मजुरीच्या स्वरूपात दोन हजाराची नोट देणे सुरू केले आहे.
जिल्ह्यातील कोरची, धानोरा, कुरखेडा, अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यांमध्ये या हंगामात तीनशे कोटींच्या जवळपास उलाढाल होत असते. यावरच या भागातील आदिवासींचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यंदा मिळालेली मजुरी बँकेत त्यांना जमा करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर त्यांना ‘पॅनकार्ड’ची छायांकित प्रतसुध्दा द्यावी लागत आहे. त्यामुळे आदिवसिंमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मागील तीन वर्षात या परिसरात दोन हजाराची नोट दुर्मिळ होती. यंदा मात्र सर्वत्र दोन हजाराच्याच नोटा दिसून येत असल्याने तेंदू कंत्राटदार मजुरीच्या आड काळ्याचे पांढरे करीत असल्याची चर्चा आहे.
नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष : -
दोन हजाराची नोट बंद झाल्याने नक्षल्यांवरही संकट ओढवले आहे.खंडणीतून मिळालेल्या दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ते देखील प्रयत्न करणार.तेंदू हंगाम यासाठी सोयीचे ठरू शकते. त्यामुळे पोलीस विभाग यावर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे पोलीस अधीक्षक,नीलोत्पल यांनी सांगितले.