सावली तालुका प्रस्तावित चिमूर जिल्ह्यात समाविष्ट होणार ? सावली तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध.
एस.के.24 तास
सावली - चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर जिल्हा निर्माण करण्याची मागणी फार जुनी आहे. प्रशासकीयदृष्ट्या ही मागणी चुकीची नाही. चिमूर ब्रम्हपुरी पासून जिल्हा मुख्यालय 100 किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अनेक अडचणी येतात, त्यांना व्यापार व इतर कामाकरिता नागपूर सोयीचे आहे. या गैरसोयीमुळे जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे व नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे स्थापनेची घोषणा झाली.
यात सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी ही तालुके जोडण्यात आली आहेत. यामुळे नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिक नाराज असून चिमूर ऐवजी नागभीड जिल्हा,ब्रम्हपुरी जिल्हा करा ही मागणी जोर धरत आहे.चिमूर जिल्हा झाल्यास चिमूरला जाणेसाठी नागभीड,ब्रम्हपुरी तालुक्यातिल नागरिकांना दळणवळणाचे सोयी नसल्याने, शिक्षणाच्या सोयी नसल्याने, आरोग्य सुविधा योग्य नसल्याने नागभीड व ब्रम्हपुरीकरांचा विरोध साहजिकच आहे.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी हे तालुके शासकीय परिपत्रकात जोडलेले आहे मात्र जेव्हा चिमूर जिल्ह्याची निर्मिती होईल त्यावेळेस सावली तालुका जोडण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील नागरिक विरोध करू लागले आहेत. चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी तालुके तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी तालुके असल्याने सावली तालुका वगळून जिल्हा निर्मिती होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र सावली तालुक्यासाठी चिमूर हे सर्वच दृष्टीने गैरसोयीचे असल्याने सद्यातरी समज माध्यमातून विरोध होत आहे. पुढे सावली तालुक्यात तीव्र आंदोलन होण्याची चिन्ह आहेत.
सावली साठी चिमूर नको तर ब्रम्हपुरी, गडचिरोली पर्याय ?
सावली तालुका चिमूर जिल्ह्यात समाविष्ट होण्याची शक्यता असल्याने विरोध सुरु आहे.यावेळी चिमूर नको तर ब्रम्हपुरी चालेल का ? असाही पर्यायाचा प्रस्ताव समाजिक माध्यमात सुरु आहे त्यावर ब्रम्हपुरीही नको तर जिथे आहे तिथे चंद्रपूरच बरे असा सूर उमटत आहे.गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट केले तर चालेल असे नागरिक चर्चा करीत आहेत पण दारूबंदी जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी मद्यसम्राटाचा विरोध राहील त्यामुळे हेही शक्य नसल्याची चर्चा जोरात आहे.