बोरगाव बुट्टी येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
★ रामदास चौधरी,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि साहस विद्यार्थिनी वैष्णवीचा पुढाकार.
एस.के.24 तास
चिमुर : गावातील लहान बालके आणि किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतचे सरपंच रामदास चौधरी,प्राथमिक आरोग्य केंद्र भिशी आणि साहस शिबिराची विद्यार्थिनी वैष्णवी ननावरे यांच्या पुढाकाराने चिमूर तालुक्यातील बोरगाव बुट्टी या गावात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 14 जून 2023 रोजी करण्यात आले.
ब्राईटएज फाउंडेशन द्वारा आयोजित साहस शिबिरामध्ये 16 ते 25 वयोगटातील मुलींना स्त्रीसमस्यांविषयी जागरूक करण्यात येते. सोबतच त्या समस्येवर काम करण्यासाठी प्रेरित केल्या जाते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र भिशी यांच्या सहकार्याने स्त्री आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.अनुश्री नांदगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, लहान मुलांमध्ये असलेले कुपोषण यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर वैष्णवीने स्वतःच्या कृती कार्यक्रमांमध्ये कुपोषण आणि स्त्री आरोग्य यावर काहीतरी काम करण्याचे निश्चित केले. शिबिरानंतर गावी परतल्यावर गावचे सरपंच रामदास चौधरी यांना तिने आरोग्य शिबिरा आयोजित करण्याविषयी विनंती केली. कृतिशील व कर्तव्यतत्पर असलेले सरपंच रामदास चौधरी यांनी तिच्या विनंतीला मान देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, भिशी येथील डॉक्टरांशी संपर्क करून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले.
आज आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 18 लहान मुलांचे वजन-उंची तर किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांना औषधी सुद्धा देण्यात आल्या.
सोबतच डॉ.अनुश्री नांदगावकर,आरोग्य सेविका कल्पना आटे, सिस्टर आरोग्य सेवक निशिकांत चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता आशाताई टेम्भुरकर, अंगणवाडी सेविका प्रीती मुन आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. असा जनउपयोगी उपक्रम आयोजित केल्याबद्दल साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी यांनी सरपंच रामदास चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आभार मानले आणि साहस विद्यार्थिनी वैष्णवी नन्नावरे हीचे कौतुक केले.