रानडुक्कराचे हल्ल्यात मचारना येथील शेतकरी गंभीर जखमी.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : सहवनक्षेत्र किटाडी चे अधीनस्त असलेल्या नियतक्षेत्र मचारना येथे शेतशिवारात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अचानक रानडुक्कराने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार(ता.३०) रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भर्ती करण्यात आले. जखमीचे नाव प्रकाश भाउराव चेटूले रा. मचारना, तालुका लाखनी असे आहे. वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आद्रा नक्षत्राची सुरुवात होताच वरून राजाचे कृपादृष्टीने खरीप हंगामात धान पिकाची पेरणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्ग शेतात काम करीत असतो. जखमी प्रकाश चेटूले ही नाल्या लगत असलेल्या शेतावर पेरणी चे करीत असताना नाल्यात दबा धरून बसलेल्या रानडुक्कराने अचानक हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली. त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतातील शेतकरी व मजूर मदतीसाठी आल्याने रानडुक्कर पळून गेला. घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली व जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे भर्ती करण्यात आले.
प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी पंचनामा केला. यावेळी किटाडी क्रमांक १ चे वनरक्षक सुधीर कुंभरे उपस्थित होते. या घटनेने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.