शा.आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू : विद्यार्थी वर्गात प्रचंड उत्साह.
एस.के.24 तास
चंद्रपूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १२ जून पासूनच आँनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश पध्दती, नियमावली उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रणाली व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील.अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवारांना अर्ज पडताळणी,स्विकृती,निश्चिती करता येईल. प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे.अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाच यूजर आयडी म्हणून तयार होईल.
अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी १०० रु. आहे तर खुल्या प्रवर्गासाठी रू. १५० आहे . प्रवेश अर्जातील माहितीच्या दाव्याच्या पृष्टयर्थ आवश्यक मुळ/ कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा संच सोबत असावा. प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेरी करता विचार करण्यात येईल. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन निवड पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. दि. १९ जून पासून ११ जुलै पर्यंत अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in, www.dvet.gov.in या संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी.
युवकास आवश्यक असलेले पायाभूत व्यवसाय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आलेली आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रूपये विद्यावेतन मिळणार आहे.
प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्था निहाय विकल्प सादर करण्यासाठी दि. १९ जून ते १२ जुलै या दरम्यान करता येईल . प्राथमिक गुणवत्ता यादी दि. १३ जुलैला प्रसिद्ध होईल. प्रवेश अर्जातील हरकतीनंतर अंतिम गुणवत्ता यादी दि.१६ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. पहिली प्रवेश फेरी दि.२१ जुलै ते २५ जुलै पर्यंत होणार आहे. यात निवड झालेल्या संस्थेत उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी.
दुसरी प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्था निहाय विकल्प सादर करण्यासाठी दि. २१ जुलै ते २५ जुलै हा कालावधी असून दुसरी प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही दि.१ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.तिसरी प्रवेश फेरीसाठी उमेदवारांनी व्यवसाय व संस्था विकल्प सादर करण्यासाठी १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या दरम्यान करता येईल.तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष कार्यवाही १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या दरम्यान करण्यात येईल.
चौथी प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही २१ ऑगस्ट २४ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी पात्र व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे २२ व्यवसायाच्या ३६ तुकड्यांमध्ये एकुण ७७६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होत असून या संधीचा लाभ घ्यावा, असे शास.औ.प्र.संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी कळविले आहे.