०२ जून ला ब्रम्हपुरी जिल्हा निर्मातीसाठी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा व आंदोलन.

०२ जून ला ब्रम्हपुरी जिल्हा निर्मातीसाठी  उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा व  आंदोलन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०५/२३ शासनाने नवीन २२ जिल्हे बनविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ब्रम्हपुरी जिल्हा बनण्याच्या दृष्टीने सन १९८२ पासुनच पूर्णत: निकषामध्ये बसला आहे. फक्त राजकीय प्रभावाने त्यावेळी ब्रम्हपुरी जिल्हा न बनता गडचिरोली जिल्हा घोषीत करण्यात आला होता. तेव्हापासून ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य नगरी म्हणून योग्य असल्याचा ठप्पा लागला आहे.यापुढे ब्रम्हपुरीच जिल्हा होईल अशी तीव्र आशा ब्रम्हपुरीकरांना आहे. 
मागील ४० वर्षापूर्वी सन १९८२ पासून येथील जनतेची जिल्हा निर्मितीची मागणी आहे. ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ब्रम्हपुरी चंद्रपूर जिल्ह्याची जुनी तहसिल आहे. पूर्वीपासून जिल्ह्यात चंद्रपूर नंतर ब्रम्हपुरीचा दुसरा क्रमांक लागतो याप्रकारच्या सोयी सुविधाही आहेत. भौगोलिक दृष्टीने हा तालुका परिपूर्ण आहे. महसुलची जागा ब्रम्हपुरी शहराच्या सभोवताल आहे. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती सुसज्ज आहेत. 

इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्याला जिल्हा घोषीत केल्यास अगदी कमी खर्च लागणार असल्याने शासनाने ही बाब अधोरेखीत केली आहे. ब्रम्हपुरी जिल्हा घोषीत होणार असा चंद्रपूर येथील नागरीकांना देखील विश्वास आहे. यापूर्वी ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने अनेक आंदोलने झाली आहेत. जिल्ह्यासाठी कोर्ट,कचेऱ्या नागरीकांनी पाहील्या आहेत व ब्रम्हपुरी जिल्हा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुध्दा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

 तद्वतच ग्रामपंचायत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून या अगोदर शासनाला पाठविण्यात आले आहेत. ब्रम्हपुरी हे 'भारतातील महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतीमहत्वाचे शहर आहे. मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. मात्र चिमूर हे ठिकाण फार लांब टप्प्यात येत असल्याने येथे विविध कामकाजासाठी जाण्याकरीता कमालीचा त्रास सहन करावा लागेल. 

शिवाय या उलट ब्रम्हपुरी हे शहर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. ब्रम्हपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवीन इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. बस आगार, दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वे सुविधा आहे, औद्योगिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

 व इतर शासकीय उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी ब्रम्हपुरी परिसरात जवळजवळ ५०० एकर शासकीय जमिन उपलब्ध आहे. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरातील जनतेला शासकीय व इतर कोणत्याही कामकाजाकरीता सोयीचे आहे. ब्रम्हपुरी तालुका हा चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा एक असतांनाच सर्वात जुना तालुका आहे. नागभीड, सिंदेवाही हे सध्याचे तालुकेही त्यावेळेस ब्रम्हपुरी तालुक्यात समाविष्ट होते. 

न्यायालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी ही सर्व कार्यालये त्यावेळेपासून ब्रम्हपुरीत अस्तित्वात आहेत.ब्रम्हपुरी पासून वडसा, कुरखेडा, आरमोरी, नागभीड,कोरची,सिंदेवाही या तालुक्यांची गावे अवघ्या ५० किलोमीटर अंतराच्या आत येत असून चारही बाजुने दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. एक जिल्हा होण्याकरीता लागणारे सर्व शासकीय निकष ब्रम्हपुरीच्याच बाजुने आहेत आणि ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. तरीही जेव्हा जिल्हा निर्मितीचा मुद्दा ऐरणीवर येतो तेव्हा ब्रम्हपुरीकरांवर अन्यायच होत आहे. 

त्यामुळे आता ब्रम्हपुरीकरांनी जिल्हा निर्मिती होण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने कंबर कसली असून क्रांतीची मशाल घेऊन येत्या दि. ०२ जून २०२३ रोजी सकाळी ९.०० ते २.०० दरम्यान आपल्या कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा व चक्काजाम आंदोलन करत ब्रम्हपुरीकर रस्त्यावर उतरणार आहेत.

 आणि यापुढेही जिल्हा घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही अशी भुमिका ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे. अशी माहिती शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती ब्रम्हपुरीच्या वतीने देण्यात आली.

यावेळी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक प्रशांत डांगे, विनोद झोडगे, सुरज शेंडे, अविनाश राऊत, सुधाकर पोपटे, राजू भागवत, दीपक नवघडे, सुरज विखार, राहुल सोनटक्के, सुनील विखार, यांच्यासह अन्य ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !