संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे शिक्षकांची जबाबदारी. - व्याख्याते राहुल मैंद.
★ हिंदू ज्ञान मंदिर स्कूलचा उपक्रम-ग्रिष्मोत्सव समारोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : दिनांक, ०८/०५/२३ विद्यार्थी शाळेत शिकत असतांना ज्ञानार्जन करीत असतात. मात्र विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच जे संस्कार असायला पाहिजेत ते गुण बऱ्याचदा दिसत नाही. त्यामुळे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे ही शिक्षकांची खरी महत्वाची जबाबदारी असल्याचे बहुमोल विचार व्याख्याते तथा पत्रकार राहुल मैंद यांनी व्यक्त केले.
ते ब्रम्हपूरी शहरातील हिंदू ज्ञान मंदिर स्कुलमध्ये आयोजित ग्रिष्मोत्सव (समर कॅम्प) च्या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष बाबासाहेब कहारे, संस्था सचिव प्रबीर चौरीकर हे उपस्थित होते.यावेळी बोलतांना बाबासाहेब कहारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की संपूर्ण जगाला आंतरजाळ्याच्या विळख्यात ओढणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
ग्रिष्मोत्सव शिबीरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व बौध्दिक क्षमता वाढविण्याऱ्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, नृत्य, विविध खेळ, कराटे, इंग्लिश स्पिकींग, वैदीक, गणित, डिश डेकोरेशन ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे व प्रशस्तीपत्र वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हर्षा आबदेव यांनी तर आभारप्रदर्शन सौ. स्नेहा मस्के यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.