पुस्तक समिक्षा...
स्वच्छतेचा संदेश देणारे "गाव रामायण "
एस.के.24 तास
गडचिरोली : काव्य म्हणजे मनात आलेले विचार,जीवनात घेतलेली अनुभूती याचे कमीतकमी शब्दात प्रभावीपणे कागदावर प्रगटीकरण , या पध्दतीने काव्याची सरळ व्याख्या करता येईल. अनेक कवी आपापल्या क्षमतेनुसार कविता करून त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचा लिहिण्याचा बाज,ढंग,विषय, लेखनशैली ही वेगवेगळी असते. याला गडचिरोली येथील सुप्रसिध्द कवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे हे सुध्दा अपवाद नाहीत.त्यांनी चंद्रगीत ,वनव्यातील झाडं,या यशस्वी काव्यसंग्रहानंतर त्यांचा "गाव रामायण" नावाचा तिसरा कथागीत संग्रह प्रकाशित झालेला आहे.या संग्रहाचे इतर काव्यसंग्रहापेक्षा वेगळे वैशिष्ट्ये आहे.याचे कारण कथानक आणि काव्य यांचे मिश्रण. यातील त्यांचे लेखन ग्रामीण जीवनाची नाडी ओळखणारे असून त्यांनी गाव विकासाचे,कल्याणाचे,गावच्या आरोग्याचे हीत जोपासले गेले पाहिजे यादृष्टीने ह्या संग्रहाची निर्मिती केलेली दिसते.समाजातील लोकांना स्वच्छतेचा मंत्र देणारा,राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालणारा "गाव रामायण" हा त्यांचा प्रभावी काव्यप्रकार आहे.हा संग्रह वाचतांना आपल्याला गदिमांच्या गीत रामायणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
समाजातील अतिशय घाणेरडी वस्तू ,म्हणजे गावालगतची "गोदरी". गोदरी गावी असणे याचे कारण गावातील लोकांची सामाजिक , आर्थिक,मानसिक उत्तम नसने . सोबतीला अंधश्रध्दा आहेतच . कवी डॉ. लेनगुरे या अशा वेगळ्या विषयावर तुटून पडलेले दिसतात .याद्वारे त्यांनी समाजऋण फेडलेले आहे. यासाठी ते निश्चित गौरवास्पद आहेत.
"संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान" हे शासनाच्या वतीने राबविले जाते. काव्यलेखक हे ग्रामीण भागात व्यवसायाने डॉक्टर होते. ते जलस्वराज्य प्रकल्पात आरोग्य व स्वच्छता तज्ञ म्हणून काम करीत असतांना त्यांचा या विषयाशी घनिष्ट संबंध आला.तसेच शासकिय सेवेत आरोग्य विस्तार अधिकारी,वैद्यकिय अधिकारी या पदावर काम केल्याने ग्राम जीवनाच्या समस्येंशी,तेथील लोक, गावचे कर्मचारी,शिक्षक,मुख्याध्यापक,अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामसभा या सर्वांशी ते जवळून परिचित आहेत.त्यामुळे त्यांच्या काव्यात या सर्व पात्रांची विश्लेषणात्मक, उद्बोधक,प्रतिकात्मक अशा स्वभावचित्रणाची सर्वत्र रेलचेल दिसून येते. या सर्वांचा त्यांना आलेला चांगला - वांगला अनुभव आपल्या संग्रहात शब्दबध्द करून ते विनोदी शैली निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत.प्रसंगानुसार योग्य त्या आशयाची कविता,तेथेच योग्य कवितेचा कलाप्रकार हाताळण्याची कला, कथानकात शेवट काय होईल? याची लागून राहिलेली उत्कंठा हे या संग्रहाचे वैशिष्ट्ये होय.
त्यांच्या या संग्रहाचे पारायण अथपासून इतीपर्यंत वाचावेच लागते.कारण या संग्रहात वराहपूर नावाच्या गावची काल्पनिक कथा दीर्घ काव्यरूपात गुंफलेली आहे.यातील ५० ही कविता एकमेकांशी संबंधीत आहेत.काव्यकथा पूर्ण वाचल्यानंतर गाव हे "कोण होतास तू ,काय झालास तू" असे मुखातून सहज उद्गार निघाल्याशिवाय राहात नाही.एवढी या संग्रहाची ताकद आहे.स्त्री शक्ती एकवटली म्हणजे वंगाळ गाव पलटून त्याचे बक्षिसपात्र गावात रूपांतर होऊ शकते.ह्याचे जीवंत चित्रण काव्यरूपात उभे केले आहे.वाईट माणसे,टंगे पोरं स्त्रीशक्ती एकवटली तर कसे सुतासारखे सरळ होतात हे कवींने त्याचे संग्रहात मोठ्या खुबीने वर्णन केलेले आहे. जे आपल्या मनाला सतत आनंदाच्या गुदगुल्या करतात. आणि वाचतांनी आपणही या कथेचे कोणतेतरी पात्र आहे. हे समजून स्वतःला विसरून जातो. हे या संग्रहाचे बलस्थान आहे.गोदरीतील स्त्रीची भावना व्यक्त करताना कवी म्हणतात...
हागणदारी च्या पटांगणी
धनी जोखीम रे मोठी
हिच्या परीस बरी
आहे वेश्येची कोठी
वेश्येच्या कोठीत जे काही चालते ते चार भिंतींच्या आत चालते. पण गोदरीत स्त्रियांना सर्वांसमक्ष उघड्यावर बसावे लागते.त्यामुळे कवीला गोदरी ही वेश्येच्या कोठीपेक्षा भयानक वाटून या समस्येला संग्रहाच्या रूपात वाचा फोडून गावात शौचालय बांधा रे,असे सतत ओरडून सांगत आहेत..
एवढ्यावरच चिडून ते थांबत नाही तर शौचालय बांधण्यासाठी ...
आतल्या गाठीतील काढा धन
आसू आले तरी झाका नयन
एक शौचालय बांधून,
तू खरच हो शहाणा
प्रत्येक स्त्री पै पै साठवून काही ना काही बचत करीत असते. यास आपण "खमोरा" म्हणतो. हा खमोरा जमा करण्याची प्रथा ग्रामीण स्त्रियांमध्ये आहे. तो बाहेर काढून शौचालय बांधण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा ते उपायही सांगतात.गाव
गोदरीमुक्त करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चारही प्रकाराचा उपयोग करावा लागतो, त्याचे यथार्थ वर्णन गाव रामायणात केलेले आहे.
गावातील सरपंचाला "देवाच गाव" गोदरी मुक्त नसल्याची खंत असते. कारण शेजारचे राजगड हे मुक्त झाले आहे.तेव्हा सरपंचाच्या भावना कवी शब्दात व्यक्त करतो...
आज कां जीव माझा रडे?
बघ शेजारी निर्मल गाव गडे
नर नारी दोघे गोदरीत पहातो
अधर्म मी कां रोज साहतो
सुधारण्याचे यांना दे लवकर देवा धडे
बघ शेजारी निर्मल ग्राम गडे
गावचा सरपंच माणसं बाया एकाच गोदरीत उघड्यावर बसलेले पाहतो.हे त्यास सहन होत नाही. म्हणून तो दोघांनाही घरी शौचालय बांधण्यासाठी "बुध्दी दे रे" म्हणून देवाकडे साकडे घालणारा सरपंच याच संग्रहात बघायला मिळतो.सरपंचास हा मोठा अधर्म वाटतो.कवितेतील हे सरपंचाचे आसू ,रडगाणे आपल्याही डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे वाटते.
शौचालयाचा विरोध करणाऱ्या टंग्या,रंग्या अशा समाजकटंकावर स्त्रीच्या मुखातून कवी चप्पल मारतानी म्हणतो....
युक्तीवाद हा थोतांडाचा
विरोध नेहमी या सांडाचा
काढा चप्पल दुर्गानो,
उतरवू यांचा माज
गोदरीतून सुटका करून,
राख अमुची लाज
सरपंचा घे हा ठराव आज
अशी गावगुंड विरोधकांची स्त्रिया एका सुरात आरती उतारून गाव गोदरीमुक्तीचा ठराव घ्यायला गावलोकांना भाग पाडतात. हा ठराव पारीत झाल्यानंतर त्या एवढ्या आनंदीत होतात कि,लाखो मैल दूर असलेला सुर्यदेव सुध्दा यामुळे खुष झाल्याचा त्यांना भास होतो.या प्रसंगी त्या आनंदाने फुगड्या खेळून गातात....
स्त्री शक्ती पाहून,
आज सुर्य हासला
ठराव जाहला ग
सखे ठराव जाहला
शौचालयात समरस होण्यासाठी कवी छोट्या बालकांना शौचालयाची कट्टी न धरता गट्टी जमविण्याचा, तेथेच मन रमविण्याचा आपल्या शैलीत सल्ला देतानीच तो वापरासंबधी शपथ घ्यायला भाग पाडतात. हा कवी शौचालयासाठी छोट्या बालकांसाठी सुध्दा एवढा आग्रही असू शकतो, हे कल्पनेच्या पलीकडे आहे.
अशा प्रकारे ५० कवितांची माला गुंफून कथानक पुढे नेत नेत ग्राम स्वच्छता मोहीमचे चित्र मोठ्या शिताफिने कवीने रंगवत नेले आहे. काही गावकऱ्यांचा या मोहीमेस विरोध असला तरी कवीने त्यांचीही बाजू सफाईदारपणे मांडून त्यांनाही न्याय दिलेला आहे.या विरोध प्रतिरोध चढाओढीमुळे कथा रंगत गेलेली आहे. प्रथम प्रसंगाची कथा सांगून नंतर त्या अनुरूप लगेच गीत सादर करणे. इथे कवीच्या प्रतिभेची उत्तुंगता,भरारी दिसून येते.ही साधना सर्वांना शक्य नाही. मात्र या कवीत ही काव्यशक्ती असल्याने हे गाव रामायणाचे इंद्रधनूष्य त्यानी लिलया पेललेले दिसून येते.याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.
या कवीने राष्ट्रसंतांच्या कल्पनेतील "स्वच्छ गाव" ही संकल्पना साकार होण्यासाठी काव्यरचनेचा उत्कृष्ठ वापर केलेला आहे.जे सर्वांसाठी प्रबोधनात्मक, प्रेरक अशी सुंदर कलाकृती आहे. कलापथकांनी या काव्याचे मंचीय सादरीकरण केल्यास हे काव्य समाजात वेगळं स्थान निश्चितच निर्माण करेल. कवीने या दृष्टीने प्रयत्न करावा.
या संग्रहाचे मुखपृष्ठ त्यांचे सुपुत्र स्वप्नील लेनगुरे यांनी संग्रहानुरूप विनोद दर्शवील अशा प्रकारचे रेखाटलेले आहे.साई ग्राफिक्स गडचिरोली यांनी उत्तम छपाई केलेली आहे.आणि विशेष म्हणजे झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीने ते प्रकाशित केलेले आहे.तसेच गडचिरोलीचे ज्येष्ठ साहित्यिक दिवगंत संभाजी होकम यांची प्रस्तावना आणि त्यांचेच मित्र संदीप तेंडोलकर यांचे पारायणरूपी शुभेच्छा या पुस्तकाला लाभलेल्या आहेत.पुस्तक निर्मितीसाठी कवीने झाडीपट्टीतील लोकांचाच उपयोग केलेला आहे , ह्याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल.
हे पुस्तक मन लाऊन पूर्ण वाचल्यास कवी गावे गोदरीमुक्त झाली पाहिजेत यासाठी झपाटलेले दिसतात.आपणासही पुस्तक वाचतांना अंगात स्फूर्ती, एकप्रकारची नशा चढते.या नाट्यकाव्यात त्यांचे पात्रांसोबत नकळत आपणही मुशाफिरी करू लागतो.स्त्रियांच्या पक्षाच्या बाजुने उभे राहून त्यांच्या कंपूत नकळत शिरून जातो.आणि टंग्या सारख्या समाजकंटकांना मनातून शिव्या देत राहतो. एवढी ताकत या संग्रहाची आहे.
यमक साधणाऱ्या रचना,साधी सोपी ग्रामीण भाषा,ग्रामीण जीवनाचे उमटलेले रंग,वाचतानी विनोदानी मन प्रफुल्लित ठेवणाऱ्या रचना,बहुजन समाजातील स्त्रियांचे समस्या समजून घेणारा असा हा काव्य संग्रह आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे .या संग्रहाने झाडीपट्टीत अजून मानाचा तुरा रोवून झाडी मंडळाचा गौरव निश्चित उंचावलेला आहे.
-----------------
गावरामायण-कथागीतसंग्रह,
कवी- डॉ. चंद्रकांत लेनगुरे
किंमत- १५०/-
पत्ता-चामोर्शी रोड ,साईनगर गडचिरोली. मो.९४२३६४६७४३
---------------------
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर
झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर