उपसंपादक : नितेश मॅकलवार📲 8806812818
चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेज असून, चार तरुणांचा आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज (Chichdoh Barrage) मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.मोनू त्रिलोक शर्मा (२६), रा.गडचिरोली, प्रफुल्ल विठ्ठल येलुरे ( २० ), शुभम रुपचंद लांजेवार (२४), महेश मधुकर धोंगडे (२०) सर्व रा. चामोर्शी अशी मृतांची नावे आहेत.
आज उपरोक्त चार जणांसह अन्य काही युवक चिचडोह बॅरेजवर गेले होते. पाच जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले.परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले.एक जण कसाबसा बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले.
परंतु नाव उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पाण्यात उड्या मारल्या. तासभर शोधमोहीम राबविल्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या साह्याने दोरखंडाचा आधार घेत चार युवकांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.