खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा. ★ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोठी हानी.

 


खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा.


★ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोठी हानी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,३०/०५/२३ काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  


चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.दुसरीकडे, एक युवा नेता अकाली गेल्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यांच्या रूपाने काँग्रेसला महाराष्ट्रात खाते उघडता आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !