सेवानिवृत्त शिक्षकांची दोन महिन्यापासून निवृत्ती वेतन थकित - उपासमारीची पाळी ; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
नरेंद्र मेश्राम
भंडारा : सेवानिवृत्त शिक्षक पंचायत समिती लाखनी अंतर्गत येणारे शिक्षकांची निवृत्ती वेतन दोन महिन्यानंतरही खात्यात जमा झाले नाही. मे महिना उजाडला तरी मार्च महिन्याची पेन्शन खातेदारांना न मिळाल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहार संकटात सापडलेले आहेत.
दप्तर दिरंगाई चा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. शासन व प्रशासन यांच्यात सामंजस्य नसल्याने विविध योजनांचा फज्जा उडताना आपण अनुभवले आहे. उभ्या आयुष्यभर शैक्षणिक सेवा देऊन कित्येकांची आयुष्य सुखकर करणारे ज्येष्ठ शिक्षक आयुष्याच्या संध्याकाळी निवृत्ती वेतनाकरिता संकटात सापडलेली आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना अगदी वेळेत निवृत्तीवेतन पुरवावी अशी मागणी निवृत्त वेतनधारक माजी उपाध्यक्ष पेन्शनर असोसिएशन तालुका लाखनी के. ना .कापसे, खेमराज लांडगे, हरभजी भुरे व इतर निवृत्ती शिक्षकांनी केली आहे.
महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत निवृत्तीवेतन खात्यात जमा होणे अनिवार्य आहे. शासनाचा तसा जीआर सुद्धा संबंधितांना आहे. तरीही वेळेत निवृत्तीवेतन न मिळाल्याने सेवानिवृत्त शिक्षक हवालदिल झालेले आहेत.