जिल्हास्तरीय छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न.
★ चंद्रपूरचा गौरव वाढेल असे यश संपादन करा : ना.सुधीर मुनगंटीवार
एस.के.24 तास
चंद्रपूर : मिळालेल्या ज्ञानाचा सकारात्मक दृष्टीने आपण सदैव विचार केला पाहिजे आणि तशी आपल्याकडून सृजनात्मक कृती केली गेली पाहिजे. आपल्यातील ऊर्जेला योग्य दिशा मिळावी, यासाठी शासनातर्फे होत असलेले शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर ही संकल्पना कौतुकास्पद असून या शिबिरातून युवा वर्गाने प्रेरणा घेऊन जीवनात यश संपादन करावे. जेणेकरून चंद्रपूरचा गौरव वाढेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे जिल्हास्तरीय आयोजन प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ना.मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी आ.किशोर जोरगेवार, आ. सुधाकर अडबाले, फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य रवी मेहेंदळे,जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात लावलेल्या शैक्षणिक प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते व आ.सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत झाले.
या शिबिरांमध्ये स्पर्धा परीक्षा तयारी विषयावर सहाय्यक जिल्हाधिकारी मुरगानंथम एम. यांनी मार्गदर्शन केले तर पालक- विद्यार्थांसाठी दिशादर्शन या विषयावर पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी विचार मांडले. दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी या विषयावर डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवर यांनी विचार मांडले . महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया विषयावर डॉ. सुधीर आकोजवार यांनी मार्गदर्शन केले तर गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.मनीष उत्तरवार यांनी'करिअर व ध्येय निश्चिती' विषयांवर विचार मांडले. प्रा.शाम हेडाऊ यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर 'करिअर कसे घडवावे ?
' या विषयावर विजय मुसळे यांनी मार्गदर्शन केले. तर विविध स्पर्धा परीक्षा संबंधी विलास मोरे यांनी माहिती दिली. शिबिराचे सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर व अजय चंद्रपट्टन यांनी केले तर अभय घटे यांनी आभार मानले. शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थाचे प्रतिनिधींनी या शिबिरात मार्गदर्शन केले. रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना,आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी विषयी माहिती शिबिरस्थळी देण्यात आली.
जिल्ह्यातील अंदाजे चार हजार विद्यार्थी आणि पालकांनी या करिअर प्रदर्शनीस भेट देऊन शिबिराचा लाभ घेतला. तसेच ना. मुनगंटीवार यांनी सदर करियर प्रदर्शनीचे कौतुक करून या पद्धतीची प्रदर्शनी जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्याविषयी सूचना केली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेतील सर्व गटनिदेशक,निदेशक व कर्मचारी वृदांनी अथक परिश्रम घेतले.