प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप.

प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे.  त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच वर्षात राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करण्यात येत आहे.  सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप मंजूर करण्यात येत आहे.


कुसुम योजनेंतर्गत 3, 5 आणि 7.5 हॉर्स पॉवर (HP) क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात. 3 एच.पी. पंपाची जीएसटीसह एकूण किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये आहे. कुसूम योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला यासाठी 90 टक्के अनुदान वगळता 10 टक्के प्रमाणे केवळ 19 हजार 380 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95 टक्के अनुदान वगळता पाच टक्केप्रमाणे केवळ 9 हजार 690 रुपये भरावे लागणार आहे. 


 तसेच 5 एचपी पंपासाठी एकूण 2 लाख 69 हजार 746 किंमतीच्या 10 टक्के प्रमाणे 26 हजार 975 रुपये आणि  पाच टक्के प्रमाणे 13 हजार 488 रुपये भरावे लागतील. आणि 7.5 एचपी पंपासाठी एकूण 3 लाख 74 हजार 402 रुपये किंमतीच्या 10 टक्के प्रमाणे  37 हजार 440 रुपये आणि पाच टक्के प्रमाणे 18 हजार 720 रुपये भरावे लागणार असून उर्वरित रकमेचे अनुदान शासनाकडून देय राहणार आहे.


उपरोक्त सौर कृषीपंप प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर देण्यात येणार आहे.  यासाठी महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर अर्ज करावा. योजनेबाबत सर्व माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.


 तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 / 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधादेखील महाऊर्जा चे महासंचालक रविंद्र जगताप यांनी उपलब्ध करून दिली आहे. 

- जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !