‘मानवतेचे देणे – घेणे’ ही 92 थ्री आर सेंटर्स स्वच्छता कार्यातून नवी मुंबईकरांना परस्स्परांशी जोडणारी केंद्रे.

मानवतेचे देणे – घेणे’ ही 92 थ्री आर सेंटर्स स्वच्छता कार्यातून नवी मुंबईकरांना परस्स्परांशी जोडणारी केंद्रे.


नवी मुंबई

प्रतिनिधी: दशरथ कांबळे


स्वच्छतेच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये नवी मुंबई नेहमीच आघाडीवर राहिलेली असून महानगरपालिकेने राबविलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे.

अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम ‘नको असेल त्या द्या आणि हवे असेल ते घ्या’ या शिर्षकांतर्गत मागील 3 वर्षापासून शहरात तब्बल 92 ठिकाणी स्थापित ‘थ्री आर’ केंद्राव्दारे यशस्वीरित्या राबविला जात आहे. या उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने प्रसारमाध्यमांनीही या अभिनव उपक्रमाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. 

आता केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ या 15 मे पासून 5 जून पर्यंत राबविल्या जाणा-या राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमात ‘21 दिवस चॅलेंज’ अंतर्गत ‘थ्री आर सेंटर्स’ कार्यान्वित करण्याचे सूचित केले असून संपूर्ण देशभरातील शहरांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 


नवी मुंबई महानगरपालिका याबाबत आधीपासूनच जागरूक असल्याने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ अभियानांतर्गत ‘21 दिवस चॅलेंज’ मध्ये या 92 थ्री आर सेंटर्सचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. 


5 जून पर्यंत चालणा-या या अभियानाच्या अनुषंगाने शहरातील सर्व 92 थ्री आर सेंटर्सच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी बिंदुरा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने कार्यप्रणाली तयार करण्यात आलेली आहे. आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास 20 मे पासून सुरूवात करण्यात आली. 


याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. शशिकांत तांडेल, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्यासह बिंदुरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष ॲड बिंदु दुबे, सचिव श्री. कमलेश दुबे, प्रकल्प प्रमुख ॲड विनू मिश्रा व शैलेश दुबे आणि संस्था प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अशी ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. अनेकदा नागरिकांकडून वापरात नसलेल्या निरूपयोगी वस्तू कच-यात टाकल्या जातात आणि कच-यामध्ये वाढ होते.


 त्याऐवजी या टाकाऊ मात्र गरजू घटकांकडून पुन्हा वापरात येऊ शकतील अशा वस्तू कच-यात टाकल्या न जाता त्या गरजूंपर्यंत पोहचविल्या तर त्यांना लाभदायी ठरेल व कचरा कमी होईल या संकल्पनेवर आधारित ही थ्री आर केंद्रे 3 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली व टप्प्याटप्प्याने त्याची संख्या वाढवत नेली. आता नमुंमपा क्षेत्रात इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अधिक 92 इतक्या मोठ्या संख्येने थ्री आर केंद्रे चांगल्या रितीने सुरू असून त्याला वस्तू देणारांचा आणि घेणारांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


या थ्री आर सेंटर्समध्ये नागरिक आपल्याकडील वापरलेले जुने पण वापरण्यायोग्य कपडे, पादत्राणे, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू, काचेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी, पुस्तके आणून ठेवतात. या वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे नागरिकांना सोयीचे जावे म्हणून त्यामध्ये वेगवेगळे कप्पे बनविले असून त्यावर त्याची नावे लावण्यात आलेली आहेत. मात्र बरेचदा देणारे आणि घेणारे यांच्याकडून त्या वस्तूंची सरमिसळ होते. त्याचप्रमाणे अनेकदा वस्तू नीट ठेवल्या जात नाहीत व त्याची योग्य निगा राखली जात नाही.


यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे लक्षात येत असतानाच गरीब व गरजू नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी अशा थ्री आर सेंटर्स उपक्रमाची नियोजनबध्द अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारी बिंदुरा फाऊंडेशन या संस्थेने या सेंटर्सबाबत आस्था दर्शविली आणि या सेंटर्सच्या नियोजनासाठी सहयोग देण्याचे ठरविले. यापुढील काळात बिंदुरा फाऊंडेशन मार्फत सेंटर्समधील वस्तू नीट ठेवल्या जाणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत या सेंटर्सची माहिती पोहचविणे व त्याची उपयोगिता वाढविणे असे काम स्वयंस्फुर्तीने करण्यात येणार आहे. 


‘शून्य कचरा’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने नवनवे उपक्रम राबवित असून त्यांना येथील स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिकांचा उत्साही सहभाग मिळत असल्याने सर्व उपक्रम यशस्वी होतात व स्वच्छता कार्याला गती मिळते. हा ‘थ्री आर’ सेंटर्सचा उपक्रमही ‘आहे रे’ वर्गाला, ‘नाही रे’ वर्गाशी जोडणारा असल्याने या थ्री आर सेंटरला ‘मानवतेचे देणे – घेणे’ असे अत्यंत समर्पक शिर्षक देण्यात आलेले आहे.


त्यामुळे केवळ 5 जून या उपक्रम कालावधीपुरते नाही तर स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्याला नको असणा-या निरूपयोगी वस्तू आपल्या घराजवळच्या थ्री आर सेंटर्समध्ये आणून ठेवाव्यात आणि त्या गरजूंच्या उपयोगी पडतील याची खात्री बाळगावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !