अंकुर विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी तयार केले 50 बर्ड वॉटर फिडर ; शिबिरामध्ये 123 विद्यार्थ्यांचा सहभाग.
एस.के.24 तास
चिमुर : अवकाळी पावसानंतर आता उन्हामुळे 44 डिग्री सेल्सिअस तापमान गाठलेले आहे. हवामान विभागाने विदर्भात पुन्हा उष्णता लहरीचा अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे माणसांचेच खूप हाल होत आहे. जशी माणसाच्या घशाला कोरड पडते तसे पशु पक्षाचे सुद्धा हाल होत तर असतील. ही जाणीव लक्षात घेऊन ब्राईटएज फाउंडेशन द्वारा आयोजित "अंकुर" शिबिरातील विद्यार्थ्यांनी 50 पेक्षा जास्त वॉटर फिटर तयार केले आहे. शिबिर संपेपर्यंत हे विद्यार्थी त्या वाटर फिल्टरमध्ये दररोज पाण्याची व्यवस्था करणार आहे. वॉटर फिडरची गरज आणि ते बनवण्याचे प्रशिक्षण ज्ञानगंगा अभ्यासिकेचे संयोजक व आश्रयजन फाउंडेशनचे सदस्य वाल्मीक नन्नावरे यांनी दिले.
ब्राईटएज फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी 11 ते 14 वयोगटातील लहान मुला मुलींसाठी अंकुर या 20 दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये नवोदय, सैनिकी प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा आणि मानवी मूल्य या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येते आहे. या शिबिरामध्ये यावर्षी 123 विद्यार्थी सहभागी झालेले असून या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मानवी मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी व पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी पक्षांसाठी वॉटर फीडरची संकल्पना राबवण्यात आली. ही संकल्पना राबवत असताना विद्यार्थ्यांशी प्रश्नार्थक स्वरूपात संवाद साधत त्यांच्यात स्वतःहून वॉटर फीडर तयार करण्याची प्रेरणा निर्माण करण्यात आली.
पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी होणारे हाल व त्यावर उपाय यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांमध्येच ही वॉटर फीडरची संकल्पना निर्माण झाले या संकल्पना ला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल गोळा करण्यात आल्या व त्याला वॉटर फिडरचे स्वरूप देण्यात आले. हे सर्व कृती करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसत होता.
या शिबिरामध्ये अंकुर मास्टर ची भूमिका सुधाकर चौके, मीनाक्षी ननावरे, संदीप चौधरी हे पार पाडत आहेत. तसेच या शिबिराचे व्यवस्थापनासाठी स्वप्निल जांभुळे, ज्ञानेश्वर मगरे, वाल्मीक ननावरे, विलास चौधरी, मंगेश चौधरी,ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे हे परिश्रम घेत आहेत.यावेळी सुधीर चौखे व प्रफुल भरडे उपस्थीत होते.
अंकूर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना गणित,इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे वर्ग घेतले जातात. सोबतच कृतीयुक्त उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक मूल्य भूजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यामध्ये विविध खेळाच्या माध्यमातून नेतृत्वगुण निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून अंधश्रद्धा निर्मूलन करणे, संवेदनशीलता व सृजनशीलता निर्माण करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.- विवेक चौके,अंकुर संयोजक