प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या चा पोलिस अधीक्षक,नीलोत्पल यांनी केला भांडाफोड.पुन्हा मोठे मासे अडकण्याची शक्यता.

प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या चा  पोलिस अधीक्षक,नीलोत्पल यांनी केला भांडाफोड.पुन्हा मोठे मासे अडकण्याची शक्यता.


" प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र " साठी अडीच लाख  रेट.


★ वनरक्षकाने मांडला होता बाजार : अनेक बेरोजगार अडकले जाळ्यात.


मुख्य संपादक : सुरेश कन्नमवार


गडचिरोली : खोट्या कागदपत्रांआधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवून देणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होते. एका प्रमाणपत्रासाठी तब्बल दोन ते अडीच लाख रुपयांचा रेट ठरलेला होता, प्रमाणपत्र पडताळणीसाठी पुन्हा वेगळे दीड लाख रुपये मोजावे लागत,अशी माहिती तपासात समोर आली आहे.


प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या पाच जणांचा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या निनावी पत्रामुळे भंडाफोड झाला. या प्रमाणपत्रांआधारे भरती झालेल्या दोन पोलिस शिपायांसह तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या तीन उमेदवारांना २२ एप्रिलला अटक करण्यात आली.


या प्रकरणातील सहावा फरार आरोपी व सूत्रधार देविदास उर्फ बाळू मेश्राम (रा.नवेगाव,ता. गडचिरोली) यास २४ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.तो आलापल्ली वनविभागात पेरमिली वनपरिक्षेत्रात वनरक्षक आहे.त्याने स्वत : खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र काढले होते,अशी माहितीही उजेडात आली आहे.दरम्यान,सध्या अटकेतील सहाही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.


अर्धे पैसे आधी, अर्धे प्रमाणपत्र मिळाल्यावर : - 


■ दरम्यान, खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगार लाखो रुपये मोजण्यास तयार असल्याचे पाहून देविदास मेश्राम स्वतःच ही कामे करू लागला.

■ असे प्रमाणपत्र हवे असलेले बेरोजगार शोधायचे, दोन ते अडीच लाख रुपयांत व्यवहार ठरवायचा. 

★ अर्धे पैसे आधी घ्यायचे व राहिलेले प्रमाणपत्र मिळाल्यावर. 

★ ज्या कार्यालयातून हे प्रमाणपत्र वितरीत झाले, तेथूनच नंतर पडताळणी करावी लागते.हे कामही देविदास मेश्राम करुन द्यायचा. 

★ त्यासाठी तो दीड लाख रुपये वेगळे उकळायचा,असे निष्पन्न झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.



बीडमधील धागेदोरे शोधण्याचे आव्हान : -


★ दरम्यान, बनावट कागदपत्रांआधारे मिळवलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. 

★ गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमध्ये जाऊन खात्री केली तेव्हा एकाच मालमत्तेची दोन प्रमाणपत्र दिल्याचेही उघड झाले आहे. 

★ त्यामुळे प्रमाणपत्रांची सत्यता किती,असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडच्या प्रशासनात याचे धागेदोरे आहेत का,आणखी कोण कोण यात सहभागी होते, हे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेपुढे आहे.

★ गडचिरोली पोलिसाचे एक पथक याकामी रवाना झालेले आहे. 

★ यात आणखी कोण-कोण अडकणार याची उत्सुकता असून प्रमाणपत्र घेणारे ही धास्तावलेले आहेत.


गुन्हा नोंद झालेल्यांपैकी सहा जणांना अटक केलेली असून, एकाचा शोध सुरू आहे.गुन्हे शाखेमार्फत योग्य तो तपास सुरू आहे. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. आरोपीची संख्या वाढू शकते. - नीलोत्पल,पोलिस अधीक्षक,गडचिरोली


मुख्य आरोपीकडे कसून चौकशी सुरु आहे. खोट्या कागदपत्रांआधारे किती प्रमाणपत्रे मिळवली, किती जणांना दिली व कितींनी प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातून नोकरी मिळवली, याचा तपास सुरू आहे. - उल्हास भुसारी,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,गडचिरोली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !