रासेयो विभागाच्या वतीने युवकांचे आरोग्य विषयावर सखोल मार्गदर्शन. ★ तंत्रज्ञ युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ.आनंद पाटील


रासेयो विभागाच्या वतीने युवकांचे आरोग्य विषयावर सखोल मार्गदर्शन.


★ तंत्रज्ञ युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ.आनंद पाटील


एस.के.24 तास


चंद्रपूर : आपला देश हा युवकांचा देश म्हणून अलिकडे ओळखला जातो. तेव्हा त्यांच्या  उर्जेचा योग्य वापर कौशल्य विकासासाठी झाला पाहिजे. करिता व्यवसाय कौशल्य युक्त तंत्रज्ञ युवकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.आनंद पाटील (गुजरात) यांनी केले. 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कौशल्ययुक्त तंत्रज्ञ आणि आरोग्य या विषयावर ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर होते. तर रासेयो समिती सदस्य  निदेशक रामभाऊ लांडगे, अभय घटे, रमेश रणदिवे आदींची उपस्थिती होती. 


डॉ.‌पाटील पुढे म्हणाले की, रोजगार मिळवण्यासाठी युवकांना आपले गाव सोडून दुसऱ्या शहरात जावे लागते.अशावेळी ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.योग्य आहार घेत नाही. पर्यायाने ते आजारी पडतात.पुढे त्यांच्या कौशल्य विकासावर परिणाम होतो.कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडोपंत बोढेकर म्हणाले की, राजकोट (गुजरात ) प्रांतात डॉ. पाटील यांचे कार्य मोठे असून जीर्ण तथा असाध्य आजारांवर त्यांनी केलेले संशोधन  महत्त्वाचे ठरलेले आहे. 


युवकांनी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दिनचर्या सांभाळावी आणि व्यसनमुक्त जीवन पध्दती अवलंबवावी,असे आवाहन केले. राका( पळसगाव )जि.गोंदिया येथे आयोजित आदर्श ग्रामोत्थान सप्ताहात  जनप्रबोधनपर पंचरंगी कार्यक्रम सादर करून आपल्या कलेची छटा प्रस्तुत करणा-या पियुष ढाक,संघर्ष नांदे,साहिल बुलबुले,सुमित गजपुरे,आशिष गावतुरे या प्रशिक्षणार्थ्यांचा डॉ.पाटील यांचे हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु.  रिया पिपरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. कोमल बावरे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !