![]() |
चिमूरची शालू घरत राज्यात अनुसूचित प्रवर्गातून प्रथम.
★ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट क परीक्षेतील यश.
मुख्य संपादक - सुरेश कन्नमवार
चिमुर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या छोट्याशा गावची शालू घरत हिने अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तिची उद्योग निरीक्षक या पदी निवड झाली आहे. जिद्द व नियोजनबद्ध सातत्यपूर्ण अभ्यासाचा जोरावर तिने यश संपादन केल्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शालूने अनुसूचित प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला असून सध्या ती महाराष्ट्रातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे एमएससीचे शिक्षण घेत आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पांढरवाणी येथे पूर्ण झाले. दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण सरस्वती कन्या विद्यालय नेरी व आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण केले. बीएस्सी पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव येथे पूर्ण केले.
नंतर तिने चिमूर येथे नेचर फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतले. यादरम्यान तिची निवड ब्राईटएज फाउंडेशन अंतर्गत मॅजिकपरिवारा मार्फत देण्यात येणाऱ्या सहारा स्कॉलरशिपसाठी झाली. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शालूला दरमहा 2 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. या स्कॉलरशिपमुळे तिला पुन्हा पुणे येथे शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. आता तिला राज्यसेवेमध्ये यश मिळवायचे असल्याने ती पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.
तिचे आई-वडील शामकला व शामराव घरत अत्यल्पभूधारक शेतकरी असून पांढरवाणी गावात शेती व्यवसाय करतात.मुलीने संपादन केलेल्या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या यशामुळे आता आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कुटुंबाला आधार मिळणार आहे. शालूने तिच्या या यशाचे श्रेय- आई-वडील, कुटुंबीय, शिक्षकवृंद, नेचर फाउंडेशन आणि मॅजिक परिवाराला दिले आहे.
" जीवनात काहीतरी करून यशस्वी व्हायचे होते.नेचर फाउंडेशनने माझ्यामध्ये अधिकारी होण्याच्या स्वप्नाचे बीज रोवले आणि त्या स्वप्नाला भक्कम आर्थिक पाठबळ ब्राईट एज फाउंडेशन व मॅजिक परिवाराच्या सहारा स्कॉलरशिपने दिले.यामुळेच पुणे सारख्या ठिकाणी मला शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते. - शालू घरत