९ व्या वर्गाच्या विद्यार्थ्याची शालेय गणवेशाच्या टायने गळफास लावून आत्महत्या.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!एस.के.24 तास
भंडारा : लाखनी तालुक्यातील चान्ना /धानला येथील ९ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शालेय गणवेशाच्या टायने स्वत:च्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ७ ) रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लगेच त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. हिमांशू गुणेश राघोर्ते वय १५ रा. चान्ना /धानला असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समर्थ विद्यालयाचा विद्यार्थी होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक हिमांशू हा समर्थ वियालयाचा इयत्ता ९ व्या वर्गाचा विद्यार्थी असून सध्या शाळेच्या वार्षिक परीक्षा सुरु असून शनिवारी (ता. ८ ) ला इंग्रजी विषयाचा पेपर होता.हिमांशू हा अभ्यास न करता मोबाईल पाहत होता.
म्हणून त्याच्या वडिलांनी अभ्यास का करत नाही म्हणून हटकले होते.त्यानंतर हिमांशू अभ्यास करतो आणि झोपतो म्हणून घरातील हॉल मध्ये होता तर आई वडील घरात झोपले.रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास त्याचे वडील लघु शंकेसाठी झोपून उठले असता हिमांशू हॉल मधील स्लाबच्या लोखंडी हुकला शालेय गणवेशाच्या टायने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.
लगेच त्याला खाली उतरवून उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. शवविच्छेदनानंतर आज शनिवारी (ता. ८) ला मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात हिमांशू वर चान्ना येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.