पुस्तक दिनाच्या निमित्ताने डॉ.प्रतिमा इंगोले यांचा झाडीबोली साहित्य मंडळातर्फे सत्कार.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जागतिक पुस्तकदिनाचे दिवशी सुप्रसिद्ध व-हाडी लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांचे चंद्रपूरात झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने मानवस्त्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
विश्रामगृह येथे आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडेकर, ग्रामगीताचार्य प्रा. नामदेव मोरे, डॉ. धर्मा गावंडे, कवी सुनिल इखारे प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी डॉ. प्रतिमा इंगोले यांची साहित्यिक कार्याची माहिती उपस्थितांना देत डॉ. इंगोले यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. डॉ. इंगोले यांनी व-हाडी बोलीत मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. व-हाडी लोकगाथा, व-हाडी लोकभाषा हे त्यांचे संदर्भग्रंथ प्रकाशित झाले आहे. त्यांना सन २०१८ मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा बहुमानही प्राप्त झाला आहे. याशिवाय त्यांची८० च्या वर साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून प्रत्येक साहित्यकृती पुरस्काराने सन्मानित असल्याचे मत प्रतिपादन केले.
प्रा.नामदेव मोरे यांनी प्रास्ताविकात डॉ,प्रतिमा इंगोले ग्रामीण कथाकार, कवयित्री व कादंबरीकार म्हणून ख्यातनाम असून ललित, विनोदी, बालसाहित्यिक प्रवासवर्णन आदी अनेकविध स्वरुपाचे लेखन त्यांनी केले आहे. यांचे लेखन ग्रामीण वास्तव यांच्याशी जवळीक साधणारे असल्याने त्यांच्या साहित्यावर विदर्भातील वाचकांचे विशेष प्रेम आहे . अस्सल वैदर्भीय बोली हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य असल्याचेही मत प्रा.मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी साहित्यिक चर्चेला रंगत आली असताना डॉ.प्रतिमा इंगोले यांना कथा सांगण्याची इच्छा झाली. याशिवाय त्यांनी 'भुलाई' व 'उदयसोहळा' या काव्यसंग्रहावर व 'बुढाई' व 'पार्टटाइम' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरी लेखनाबद्दल चर्चा केली. यावेळी डॉ. प्रतिमा इंगोले यांनी पुस्तकदिनानिमित्त उपस्थितांना स्वलिखित 'उजाड अभयारण्य' हा ललितलेखसंग्रह भेट दिला. यावेळी ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर, कवी सुनिल इखारे यांनीही चर्चेत भाग घेतला. डॉ. धर्मा गांवडे यांनी आभार मानले.