महिलेला ' आय लव्ह यू ' म्हणताच उपनिरीक्षकाला जमावाने झोडपून काढले.
एस.के.24 तास
नागपूर : दीड महिन्यापूर्वी दारूच्या नशेत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातीलमयूरबन कॉलनीतील उघडकीस आला आहे. त्याने आधी महिलेला 'आय लव्ह यू' म्हटलं आणि पुन्हा नंतर बुलेटवरून येत महिलेचा हात धरला. दरम्यान याबाबत कॉलनीवासीयांना माहिती मिळताच त्यांनी या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला बेदम चोप दिला आहे. विशेष म्हणजे,दीड महिन्यापूर्वी देखील त्याने दारूच्या नशेत असाच प्रकार केला होता. अनिल बोडले असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
दरम्यान,याबाबत पिडीत महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, चार एप्रिलला सायंकाळी सहा वाजत त्या आपल्या घरात होत्या. याचवेळी तिथून अनिल बोडले जाता होता. तर महिलेला पाहून अनिल बोडले याने 'आय लव्ह यू' असे दोन वेळा म्हटले होते. त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला चांगलंच झापलं. परंतु तरीही तो तसाच उभा राहिल्याने पीडितेने आपल्या घराचा दरवाजा बंद केला.
तसेच घडलेल्या घटनेची माहिती पतीला फोन करून दिली. मात्र पती कामात असल्याने त्यांनी तत्काळ आईला फोनवरून माहिती देऊन घरी पाठविले. काही वेळातच महिलेचा पतीही घरी आला.
थेट पीडितेचा हात पकडला.
दरम्यान,पिडीत महिला गल्लीतील दुसऱ्या महिलांशी बोलत उभी असताना आरोपी अनिल बोडले बुलेटवरून (क्र. एमएच 20, ईबी 9918) पुन्हा तेथे आला.धक्कादायक म्हणजे, त्याने थेट पीडितेचा हात पकडला. मात्र घाबरलेल्या पीडितेने त्याला झटका देऊन हात सोडविला. याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिक तिथे जमा झाले. तर आठ ते दहा महिला,पुरुषांनी त्याला पकडून बेदम चोप दिला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, बोडले याला जमावाच्या ताब्यातून सोडवले. विशेष म्हणजे, तेव्हा बोडले हा नशेत तर्रर्र होता, असे पोलिसांनी सांगितले. तर त्याची वैद्यकीय तपासणी करून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड महिन्यापूर्वी ही घडला असाच प्रकार...
दरम्यान,अनिल बोडले याची पहिली वेळ नाही. कारण यापूर्वी 17 फेब्रुवारीला देखील त्याने याच परिसरात महिलेची छेड काढली होती. तर त्यावेळी अनिल बोडले याने दारूच्या नशेत एका महिलेच्या भिंतीवर जोरजोरात फुटबॉल मारले. तसेच पीडीत महिलेला पाहून आणखी जोरजोरात फुटबॉल मारायला लागला. मात्र महिलेने दुर्लक्ष केल्यावर बोडले शेजारील घराकडे गेला आणि कॉलनीत मोठ्याप्रमाणात आरडा-ओरड केला. त्यामुळे कॉलनीत महिला एकत्र जमल्या होत्या.
दरम्यान महिलांना पाहून,बोडले अधिकच धिंगाणा आणि धमकी देऊ लागला. तसेच शिवीगाळ करत, मी छेडछाड केल्याचं कोण म्हणाले असे म्हणत ओरडू लागला. त्यामुळे महिलांनी डायल 112 वर फोन करून याबाबत माहिती दिली होती. पोलीस तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी पीएसआय अनिल बोडले यांना ताब्यात घेतले. त्यानंतर महिलांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.