पोलिस भरती; बोगस प्रमाणपत्राचे रायगड,बीड कनेक्शन. ★ आणखी चार जणांना अटक, १४ जण सापळ्यात.



पोलिस भरती; बोगस प्रमाणपत्राचे रायगड,बीड कनेक्शन.


आणखी चार जणांना अटक, १४ जण सापळ्यात.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


गडचिरोली : बोगस प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र सादर करून पोलिसाची नोकरी मिळविलेल्या पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता बोगस प्रमाणपत्राचे कनेक्शन रायगड, सांगली, बीड जिल्ह्यापर्यंत आढळून आले. यात आणखी चार आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. आता एकूण आरोपींची संख्या १४ झाली आहे.


पोलिस उमेदवारांना प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी आलापल्ली वन विभागात कार्यरत देवीदास ऊर्फ बाळू देवराव मेश्राम हा मध्यस्थी करीत होता. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या सांगण्यावरून रायगड पोलिस दलात कार्यरत असलेला सिद्धेश पाटील यास अटक केली. त्याची विचारपूस केली असता त्याने ती रक्कम पोलिस प्रशिक्षण केंद्र, तूरची,जिल्हा सांगली येथे फार्मासिस्ट या पदावर कार्यरत असणारा हौसाजी देशमुख यास पाठविल्याचे सांगीतले. 


हौसाजी देशमुख याला म्हसवड जिल्हा सातारा येथून अटक केली.त्याची विचारपूस केली असता त्याने खोटे प्रमाणपत्र तयार करण्याकरिता बीड येथील सत्तार शेख व पांडुरंग धलपे है पैसे घेऊन मदत करीत असल्याचे सांगितले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सत्तार शेख व पांडुरंग धलपे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पांडुरंग धलपे हा पेशाने वकील आहे.


सत्तार शेख हा शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीवर नसतानादेखील विविध कार्यालयांच्या संपर्कात राहून माहिती मिळवीत होता. त्या माहितीच्या आधारे सर्व आरोपी संगनमत करून लोकांकडून मोठ्या रकमा स्वीकारून खोटे प्रमाणपत्र तयार करून देत होते.न्यायालयाने या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


सदर कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी,पोलिस उपनिरीक्षक,पुरुषोत्तम वाडगुरे,पोलिस हवालदार नरेश सहारे,हेमंत गेडाम,पोलिस नाईक सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के आदींच्या पथकाने केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !