शॉर्ट सर्किट मुळे लागली घराला आग पिंपळगाव (भोसले) येथील घटना.
जीवित हानी नाही,मात्र लाखोचे नुकसान.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१९/०४/२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील रहिवासी श्री प्रमोद अशोक टिकले पेठवार्ड यांच्या कुठार ठेवलेल्या घराला शार्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीची ठीनगी कुठारावरती पडली आणि आगीने हळूहळू आपले रुद्ररूप पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांच्या सतर्कतेमुळे लागलीच अग्निशमन विभाग नगरपरिषद ब्रह्मपुरी आणि पोलीस स्टेशन यांना सूचना दिली. आगीची माहिती मिळताच
अ -हेर नवरगाव,पिंपळगावचे बीट जमादार श्रीमान अरुण पिसे व ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय श्रीमान मोरेश्वर लाकडे,पोलीस शिपाई सावसाकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन विभागाशी संपर्क साधून लागलेली आग विझविण्यासाठी गाडीला घटनास्थळी पाचारण केले.अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच फायरमन मुकेश राऊत ,दुधराम बेद्रे,आकाश रामटेके यांनी आगीवर नियंत्रण ठेवून आग विझविली .
लागलेली आग पाहणारे प्रत्यक्ष दर्शी म्हणतात की जर घराच्या छतावरती टीन ठोकले नसते तर आगीचा आगडोंब हा खूप उंच उडाला असता आणि कित्येक घरं आगीच्या भक्षस्थानी पडून प्रसंगी जीवित वित्तहानी खूप झाली असती.सुदैवाने तसे काही घडले नाही.प्रमोद अशोक टिकले यांची आटा चक्की,मिरची पिसाई, डाळ भरडायची चक्की आहे.
नुकतीच त्यांनी आधुनिक पद्धतीची दाळ भरडायची मशीन विकत घेऊन आणलेली होती आणि ती मशीन जिथे आग लागली त्या कुटाराच्या खोलीत ठेवली होती त्यामुळे त्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
लागलेली आग ही वाढलेल्या अति उष्णतेमुळे लागली असावी असा त्यांनी व गावकऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे कारण त्यांचे आटा चक्की चे सर्विस वायर पूर्ण वितळलेले आहेत.जनावरांचा चारा याची भीषण समस्या यांच्या डोळ्यापुढे आहे. आगीने ने झालेल्या मशीनचे लाखो रुपयाचे आणि जनावरांचा चारा यांचे झालेले नुकसान यांची भरपाई शासन देईल का याकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.
प्रमोद टिकले हे आग लागली तेव्हा आपल्या शेतावरच काम करीत होते.त्यांना गावातील नागरिकांनी आगीची माहिती देताच ते तात्काळ घरी आले.पाहतात तर नवीन विकत घेऊन आणलेल्या मशीन आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत.सुदैवाने गाव होणाऱ्या मोठ्या हानीपासून वाचला हे मात्र खरे.