रामधून दिंडी म्हणजे ग्रामस्थिती चे यथार्थ दर्शन घडविणारे प्रभावी माध्यम. - बंडोपंत बोढेकर
एस.के.24 तास
चंद्रपूर : आपल्या संस्कृतीत गावाला ग्रामदेवता समजली जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर आत्मकल्याणा सोबतच समाजकल्याणाचा विचार अखिल जगताला दिला. त्यांनी गावालाच विश्वाचा नकाशा मानले. रामधून दिंडी मुळे गावाचे निरीक्षण करता येते , त्यातून गाव स्थितीचे यथार्थ दर्शन घडून येते , असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सवात ते रामधून दिंडी विषयावर बोलत होते. यावेळी विचारपीठावर चैतन्य महाराज, डॉ. नवलाजी मुळे (अड्याळ टेकडी), योगतज्ञ रामचंद्र गरड (लातुर), ज्ञानेश्वर केसाळे (यवतमाळ), नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बेबीताई काकडे, विलासराव उगे, शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, दयाराम नन्नावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री. बोढेकर पुढे म्हणाले की, आता गावोगावी सामुदायिक स्वच्छता अभियान, श्रमदान आणि रामधून दिंडी नियमितपणे चालविली गेली पाहिजे.
रामधून व ग्रंथ दिंडी कार्यक्रम स्थळ ते पाण्याची टाकी ते डॉ. आंबेडकर महाविद्यालय या मार्गाने काढण्यात आली. सूत्रसंचालन पुरूषोत्तम राऊत यांनी केले . रामधून दिंडी च्या यशस्वितेसाठी खेमदेव कन्नमवार, भाऊराव बावणे, बबनराव अनमुलवार, मधुकर टिकले, डोमाजी अर्जुनकार, गोकुल पानसे, पुंडलिक रोडे आदींनी परिश्रम घेतले.
दुपारच्या सत्रात अनुभवीयांचे मार्गदर्शन या अंतर्गत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी 'खेडेची शहराचे जनक- शहर भोक्ते खेडे उत्पादक ' या संदर्भात विचार मांडले . तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम पाटोदा चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ' ग्रामविकासाची गुरुकिल्ली- ग्रामगीता' या विषयावर सविस्तर अनुभव कथन केले आणि ग्रामगीतेचे महत्त्व पटवून दिले . सायंकाळी समारोपिय कार्यक्रमानंतर इंजि.भाऊ थुटे (वर्धा) यांचे सप्तखंजिरी कीर्तन संपन्न झाले.