चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलीस निरीक्षक कडून बेदम मारहाण.
एस.के.24 तास
गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी बेदम मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे वातावरण असल्याने गण्यारपवार हे मतदारांना बाहेर पाठवत असल्याची तक्रार पोलिसांकडे होती. त्यामुळे पहाटे ५ वाजताच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा या बाजार समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २० एप्रिल ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. चामोर्शीत सर्वपक्षीय विरुद्ध अतुल गण्यारपवार अशी लढत आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारांना ट्रॅव्हल्समधून एकत्रितपणे ते बाहेर पाठवित असल्याची त्यांच्याविरुद्ध तक्रार होती. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी १९ एप्रिलला वारंवार त्यांना फोन करुनही ते ठाण्यात आले नाहीत. २० रोजी पहाटे नाकाबंदीवेळी खांडवे व गण्यारपवार यांची भेट झाली. यावेळी खांडवे यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात गण्यारपवारांचा डावा हात फ्रॅक्चर असून गळ्यालाही मार आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,गडचिरोली पोलिसांनी गण्यारपवार यांचा जबाब नोंदवला आहे.
मी घरी झोपून असताना पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मला वारंवार कॉल करून ठाण्यात बोलावून घेतले. ठाण्यात गेल्यावर खांडवेंनी विनाकारण शिवीगाळ करू मला बेदम मारहाण केली. माझ्या भावाचे एन्काऊंटर करू अशी धमकीही दिली. – अतुल गण्यारपवार,माजी सभापती कृउबास चामोर्शीचामोर्शीतील घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे.गडचिरोली ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीनंतर नेमके काय झाले हे समोर येईल, त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- नीलोत्पल,पोलिस अधीक्षक गडचिरोली