भद्रावती येथील मौजा पिपरबोडी व डिफेन्स परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दि.09 : चंद्रपूर वनविभागातील भद्रावती परिक्षेत्रांतर्गत नियतक्षेत्र भद्रावती येथील मौजा पिपरबोडी व आयुध निर्माणी चांदा परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या व मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
2 मार्च रोजी सकाळी 6.45 वाजता सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती भद्रावतीचे वनरक्षक श्री.गेडाम यांनी दिली. वनविभागाच्या टिमने घटनास्थळी जाऊन बिबट्याला ताब्यात घेत ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर,चंद्रपूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
मागील एक महिन्यापासून मौजा पिपरबोडी व आयुध निर्माणी चांदा परिसरात सदर बिबट धुमाकूळ घालून मानवावर हल्ले करीत होता. यावर आळा घालण्याकरीता वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.बिबट्याला जेरबंद करण्याकरीता 4 पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. सदर मोहीम मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंगळे,वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.शेंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.रोडे,क्षेत्रिय कर्मचारी अंकुश येवले,वनक्षेत्रपाल श्री.शिंदे,वनरक्षक श्री.गेडाम आदींनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.