अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दि. 09 : सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे विद्यार्थी आणि सत्र 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात सीईटी देवुन व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एम.बी.ए, बी.एड, पी.एचडी, बी.एससी. ॲग्री, बी.फार्म, बी.एससी नर्सींग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मागासवर्ग आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत झाली असून अर्जदार जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाईन भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे लवकरात लवकर सादर करावा. जेणेकरून, प्रवेश प्रक्रियेत जातवैधता प्रमाणपत्राअभावी कुठल्याच मागासवर्गीयांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही,असे समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.