" क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
नरेंद्र मेश्राम!जि.प्र.!भंडारा
सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवियित्री,अध्यापिका,समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही माहिती जाणून घ्या.
जन्म : - सावित्रीबाईंचा जन्म जानेवारी १८३१, नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे झाला.
विवाह : - सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.
शिक्षण : - त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य : -
● १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
● इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.
● इ.स.१८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
● इ.स.१८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले.
५. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
● इ.स.१८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
● पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
📖 सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके : -
📘 काव्यफुले (काव्यसंग्रह)
📘 सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
📘 सुबोध रत्नाकर
📘 बावनकशी
सावित्रीबाई फुले यांचे काही काव्य : -
विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी,तो ज्ञानी मानिती जन
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी।
जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।
🌍 २०१७ साली गुगल तर्फे अभिवादन : ३ जानेवारी,२०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त गूगलने त्यांच्या महान कार्याची दाखल घेत गुगल प्रसिद्ध करुन अभिवादन केले होते.
सावित्रीबाईंचे निधन : -
1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.