अ-हेरनवरगांव ते ब्रम्हपुरी रस्त्याचे खड्डे बुजवता बुजेनात.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी :(अमरदीप लोखंडे) दिनांक,२१/०३/२३ ब्रम्हपूरी तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,शेती,दुग्ध,व्यापारी व्यवसायाच्या क्षेत्राशी निगडित असलेल्या,अहो रात्र वाहतूक साधनांची वर्दळ असलेल्याअ-हेरनवरगाव ते ब्रम्हपुरी या रस्त्याला दरवर्षी खड्डेच खड्डे पडून दैन्यावस्था गंभीर बनत असते.
या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते तेव्हा एखादा भीषण अपघात होतो आणि प्रशासनाला जाग येते व तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या माध्यमातून करतात.ठेकेदार थातूरमातूर काम करून लाखो रुपयाचे बिल काढून शासनाला पर्यायाने सामान्य जनतेला चुना लावतात.
ठेकेदार जेव्हा काम करतो तेव्हा संबंधित बांधकाम विभागाचा कोणताही शासकीय तालुका अधिकारी त्यावर देखरेख ठेवत नाही त्यामुळे दरवर्षी रस्त्याला खड्डे पडतात.खड्डे बुजवण्यासाठी जाहिरात काढल्या जाते खड्डे बुजवण्याचा ठेका दिला जातो परंतु अ-हेर - नवरगाव ते ब्रह्मपुरी रस्त्याचे खड्डे बुजत नाही.
सदर रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात मार्च एंडिंग च्या खर्च तरतुदी नुसार आणि झालेल्या खर्चाचे बिल काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले.परंतु काही ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाची गीट्टी टाकून जशीच्या तसे खड्डे ठेवलेले आहेत.
सदर रस्त्याचे दरवर्षी खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यापेक्षा कायम स्वरूपाचे सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम करण्यात यावे आणि शासनाच्या तिजोरीला लागणारा चुना थांबवावा. अन्यथा अ-हेर नवरगाव येथील जनतेला आंदोलन, बेमुदत आमरण उपोषण यासारखे शस्त्र हाती घ्यावे लागेल.