नको असलेली व बेवारस मुले टाकून न देता चाईल्ड लाईनशी सपर्कं साधण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नको असलेली, गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही, अशा जन्माला आलेल्या मुलाचे करायचे काय ? असा विचार करून सदर बाळ बेवारस ठिकाणी सोडून दिले जाते.मात्र,असे न करता संबंधित जन्माला आलेल्या अर्भकांना सुरक्षित निवारा प्रशासनाकडून देण्यात येतो. त्यामुळे नको असलेली व बेवारस मुले टाकून न देता संबधितांनी चाईल्ड लाईन यंत्रणेशी संपर्क साधावा,असे आवाहन महिला विकास मंडळद्वारा संचालित चाइल्ड चंद्रपूरने केले आहे.
जिल्ह्यात महिला व बाल विकास विभाग, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन यांच्यासह पोलिस, आरोग्य विभाग अशा सर्व यंत्रणा नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम करतात. शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक तसेच बेवारस ठिकाणी नवजात अर्भक सापडल्याचे प्रकारही मागील काही वर्षात घडले असून अशा प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला.
व त्यानंतर पालन पोषण करण्यास असमर्थ असल्यास संबंधितांनी त्याबाबतची माहिती चाईल्ड लाईन 1098, तसेच पोलिस यंत्रणेला द्यावी. यामध्ये संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते.जिल्हास्तरावरील बालकल्याण समितीला माहिती दिल्यास समितीचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचते व त्या नवजात बाळाला ताब्यात घेते. जिल्ह्यात जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनांमध्ये अज्ञात महिला मातेविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहे. अर्भक मृत आढळल्यास याबाबत गुन्हा दाखल केला जातो.
नको असलेले मुल जन्माला आल्यानंतर त्याला टाकून देण्याऐवजी बालकल्याण समितीकडे संपर्क साधावा. समिती सर्व अर्भकांना सुरक्षित ठेवते व काळजी घेते. बेवारस बाळ आढळल्यास महिला हेल्पलाइनला सुद्धा माहिती देता येते व हेल्पलाईनचे सदस्य बाळाला पोलिसांच्या ताब्यात देऊन प्रक्रिया करतात. प्रत्येक पोलिस ठाण्यात भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे, या सेलकडेही अशा घटना संदर्भात माहिती देता येते. अधिक माहितीकरीता 07172 – 299559 यावर संपर्क करावा, असे चाईल्ड लाईन चंद्रपूर यांनी कळविले आहे.