दिवं.प्रा.रघुनाथ कडवे यांना राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.

दिवं.प्रा.रघुनाथ कडवे यांना राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.


एस.के.24 तास


चंद्रपूर : अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे मुखपत्र असलेल्या श्रीगुरुदेव मासिकाचे माजी संपादक,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रघुनाथ सिताराम कडवे यांचे  गेल्या दि. २५/२/२०२३ रोजी नागपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या इच्छेनुसार कडवे परिवारातर्फे त्यांचा  देह शासकीय रूग्णालय नागपूर येथे दान  देण्यात आला. त्यांना राष्ट्रसंत विचार साहित्य  परिषद केंद्रीय समिती राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समिती चंद्रपूर, झाडीबोली साहित्य मंडळ आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.


 श्रद्धांजली सभेत सुरूवातीला  एड. राजेंद्र जेनेकर( राजुरा) यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. कडवे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.तर श्रीकांत धोटे (टाकळी ), प्रा.डॉ.श्रावण बाणासुरे (बल्लारपूर),प्रभाकर आवारी,अनिल चौधरी (रामपूर),संजीव पोडे,मोहनदास चोरे,शैलेश कावळे,विलास उगे,यवनाश्व गेडकर,एड.सारिका जेनेकर,सचिन झाडे,नामदेव पिज्दूरकर (मुल) ,देविदास वांढरे,प्रा.नामदेव मोरे,डा. रविंद्र विखार  आदींनी आपल्या शोक संवेदना श्रद्धांजली स्वरूपात अर्पण करून प्रा.कडवे यांनी सेवा मंडळात दिलेले भरीव योगदान,साहित्य निर्मिती कार्यावर प्रकाश टाकला.


 राष्ट्रसंत साहित्याचे जाणकार, निर्मोही संतसाहित्य संशोधक आपल्यातून अचानक निघून गेल्याने ही पोकळी भरून निघणे  असंभव असल्याची शोकसंवेदना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे  तंत्रनियोजन प्रा. बानासुरे यांनी सांभाळले. तर आभार श्रीकांत धोटे यांनी मानले.


प्रा.रघुनाथ कडवे यांचा काटोल तालुक्यातील धर्तीमूर्ती या छोट्या खेड्यात गरीब परिवारात जन्म झाला.  मोलमजुरी करुन आईने त्यांना वाढवले. याच काळात त्यांचा एक डोळा अधू झाला. उच्चशिक्षण घेऊन त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. 


शिष्यवृती घेऊन कृषी रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रा. रघुनाथ कडवे यांनी निरपेक्षवृत्तीने ३५ वर्षे अविश्रांत मेहनत करुन वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जीवनपट तयार केला .अनेक महत्वाच्या नोंदी मिळविल्या. अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे मुखपत्र असलेल्या  'श्रीगुरुदेव' मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी घेतली. याच काळात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या युगग्रंथाचाही हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद केला. सर्वसामान्यांना समजतील असे इंग्रजीतील सोपे शब्द वापरून त्यांनी इंग्रजी ग्रामगीतेचा  अनुवाद केला आहे.


ओव्यांचा इंग्रजीत अनुवाद करणे तसे अवघड कार्य होते. राष्ट्रसंत समग्र गद्य वाङ्मयाचे संपादनही त्यांनी केले. लेखन, संपादन व अनुवादाची त्यांची ११६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. निवृत्ती वेतनातून मिळालेला पैसा राष्ट्रसंताच्या साहित्य निर्मीती साठी वापरला. नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत अध्यासन मंडळ अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, चंद्रपूर येथील राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय  पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे धनी असलेल्या प्रा. कडवे यांचे नाव अमेरिकेतील करोलिना येथून प्रकाशित होणाऱ्या विश्वचरित्र कोषात समाविष्ट करण्यात आले आहे, हे विशेष.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !