रासेयो विभागाचे श्रमसंस्कार शिबिर : मारोती साव यांच्या आत्मकथनाने मोरवावासिय थक्क.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मोरवा येथे सुरू आहे.हनुमान मंदिर चौकात आयोजित 'मी दारुड्या बोलतोय "या एक तासाच्या आत्मकथनपर कार्यक्रमात मारोती साव यांनी आपल्या जीवनात घडलेल्या विविध घटना सांगत उपस्थितांना व्यसनमुक्तीचे धडे दिलेत. केवळ संगतीमुळे बियर पासून सुरू झालेला प्रवास पुढे देशीदारू पर्यंत पोहोचला.
पुढे शारीरिक,आर्थिक आणि संसारिक हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. या काळात जीवघेणा अपघात झाला, त्या अपघातात कसाबसा वाचलो आणि तिथून गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार केला. आता मी व्यसनमुक्त असून उच्च शिक्षणही घेतलेले आहे.यामुळे शारिरीक,आर्थिक , सामाजिक प्रगती करू शकलो.
हा चमत्कार केवळ व्यसनमुक्तीमुळे झाला. म्हणून युवकांनी तंबाखू दारू सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहावे,तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मिती साठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी बंडोपंत बोढेकर होते तर मुख्य कार्यक्रमाधिकारी नामदेव गेडकर , सरपंच सौ.स्नेहा साव,पोलीस पाटील नरेंद्र डोर्लिकर,भगवती पिदूरकर,मुख्याध्यापक अनिल आंबटकर,आदींची उपस्थिती होती.
स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात सेवा देणारे बाबा पानघाटे,शेषराव गुरनुले,विठ्ठल चौधरी,धनराज घोरूडे यांचा गौरव चिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामविकासाच्या गीतांचे गायन श्रीगुरुदेव सेवा मंडळ मोरवा व चारगाव यांनी केले.बुधवारी सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन इंजि.प्रदीप अडकिणे यांनी केले तर रोजगाराच्या संधी या विषयावर नामदेव गेडकर यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली याशिबिरात स्वच्छता अभियानासह इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, वेल्डिंगची कामे, गवंडीची कामे ,प्लंबिंगची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलीत. शाळा मैदान व कचरा व्यवस्थापनावर विशेष जोर देण्यात आला. याकरिता निदेशक महेश नाडमवार, प्रभाकर हनवते ,बंडू कांबळे, रामभाऊ लांडगे, लकिशोर बोंबले, जयेंद्र आसुटकर,रमेश रोडे,एक.बी. बोढाले आदींनी परिश्रम घेतले.सहभागी शिबिरार्थींनी नवमतदार व अल्पमुदती व्यवसाय अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या युवकांचा सर्वे करण्यात आला.