नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार शिवचेतना पुरस्काराने सन्मानित.
एस.के.24 तास
गडचिरोली : जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे शिवजयंतीच्या शुभप्रसंगी केंद्राच्या सभागृहात राज्य स्तरीय शिवचेतना पुरस्कार २०२३ यावर्षी गडचिरोली येथील महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक,संदीप कटकुरवार यांना ज्येष्ठ पत्रकार तथा सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रक्षंदाताई सोनवणे मुंबई,माजी आ.जयप्रकाश बाविस्कर,हास्य जत्रा फेम हेमंत पाटील,लेखक मनोज गोविंदवार,चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रस्तावनेतून केंद्राचे संचालक,नितीन विसपुते यांनी महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करणा-या मान्यवरांचा उल्लेख केला.उत्तम कांबळे म्हणाले की, व्यसनामुळे जे निराश झालेले आहेत, त्यांना पुन्हा चेतविण्याचे काम ही चेतना व्यसनमुक्ती केंद्र करीत आहे.म.गांधींनी स्वातंत्र्य म्हणजे शेवट नव्हे तर आपल्याला स्वराज्यकडे जायचे आहे. व्यवस्था बदलाची लढाई प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजे, असेही उत्तम कांबळे म्हणाले. सूत्रसंचालन मोहिनी सोनार यांनी तर आभार चेतना विसपुते यांनी मानले.
आपले आजोबा बापूजी कटकुरवार यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी दशेपासूनच श्री.संदीप कटकुरवार हे व्यसनमुक्तीचे प्रभावी कार्य गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने करीत आहेत. झाडीपट्टी प्रदेशात होणारी झाडीबोली साहित्य संमेलने,राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलने,वार्षिक गणेश उत्सव,दुर्गा उत्सव तसेच विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातही त्यांनी आजवर व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी स्वयंप्रेरणेने लावलेली आहे. तसेच ग्रंथ भेट देऊन जनप्रबोधन केलेले आहे.ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य आहे.
ते सदैव खादी परिधान करीत असून सर्वोदयाच्या माध्यमातून गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी गावोगावी प्रचार दौरे करीत असतात.