नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलीस शहीद,एक जखमी.
एस.के.24 तास
गोंदिया : महाराष्ट्राच्या सीमेवरील, छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीच्या हद्दीत आज, सोमवारी सकाळी ८:३० वा.च्या सुमारास १२-१४ नक्षल्यांनी चहा पिण्याकरिता विनाशस्त्र आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला.यात दोन पोलीस जवान शहीद झाले तर एक जखमी आहे. राजेश प्रतापसिंह व ललीत यादव,असे शहीद पोलीस जवानांची नावे आहेत.या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे.
बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहका-यासह सोमवारी सकाळी चहा पिण्याकरिता दुचाकीने राज्यमार्गावरील ढाब्यावर गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.यात राजेश प्रतापसिंह व ललीत यादव शहीद झाले तर तिसरा पोलीस जवान जखमी आहे.जखमी शिपायामुळेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.नक्षल्यांनी दुचाकीला आग लावून घटनास्थळावरून पोबारा केला.
ही घटना राजनांदगाव (छत्तीसगड ) जिल्ह्यात घडली असली तरी खबरदारी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर सी -६० जवान आणि पोलिसांची अधिकची कुमक तैनात करण्यात आली आहे.सिमेवरील नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर गोंदिया पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती गोंदिया जिल्हा नक्षल सेलचे प्रमुख दिनेश तायडे आणि गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी माहिती दिली.