24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी.

24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : दिनांक,22/02/2023 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे तर पशु - पक्षी प्रदर्शनी चांदा क्लब ग्राऊंडच्या समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.


राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.पाच दिवस चालणा-या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि व संलग्न विभागाच्या योजना व उपक्रमांची माहिती मिळावी याकरीता कृषी विद्यापिठाचे तंत्रज्ञान,नामांकीत व  खाजगी कंपन्याची उत्पादने,कृषी व पशु प्रदर्शन,कृषी व कृषी संलग्न विषयक परीसंवाद तसेच चर्चासत्र, अनुभवी पुरस्कार प्राप्त शेतकरी,उद्योजकांचे मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय शेती बचत गट व महीला बचत गटांमार्फत उत्पादित केलेला शेतमालांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.


तर जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनीमध्ये राज्यातून गायवर्गात देवणी,खिल्लार,लाल कंधारी,गवळावू तसेच गीर,साहिवाल,थारपारकर, रेड सिंधीच्या देशी गाई / वळू तसेच विदेशी जातीच्या संकरीत एच.एफ व जर्सीचे गाई/ वळू, म्हैसवर्गात नागपूरी, पंढरपुरी, मु-र्हा जातीच्या म्हशी / रेडा, शेळीगटात तोतापारी, बिटल, जमुनापारी, उस्मानाबादी व बेरारी जातीच्या शेळ्या / बोकड, मेंढीगटात दख्खणी मेंढ्या / मेंढा, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षीगटात कडकनाथ, कावेरी, सातपुडा, असील जातीच्या कुक्कुटपक्षी व खाकी कॅम्पबेल बदक व इतर पक्षी राहणार आहेत.


कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनात विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी व पशुसवंर्धन तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच विविध कृषी व पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जि.प. पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !