चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्यावर चक्क चाकूने हल्ला.
एस.के.24 तास
पुणे : शहरात गुन्हेगारीचा ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र मागील अनेक दिवसा पासून घडत असलेल्या घटने वरून दिसून येत आहे. त्यात आता या गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ले करण्यात येत असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.अशीच एक खळबजनक घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे.
पुणे येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने पोलीस नाईक वर चाकूने सपासप वार केले. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय-24 रा.नळदुर्ग,ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद याच्यावर आयपीसी 353,333, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दि.14 रात्री सव्वा अकराच्या सुमारास समायरा चायनिज सेंटर,धानोरी जकात नाका,लोहगाव येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक सचिन जगदाळे हे लोहगाव पोलीस नाईक पेट्रोलींग करत होते. त्यावेळी त्यांना प्राप्त झालेल्या कॉलनुसार ते समायरा चायनीज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी जेवण करण्यासाठी आला होता. त्याला जेवण मिळाले नसल्याच्या रागातून त्याने चायनिज सेंटर मधील चाकूने जगदाळे यांच्या डाव्या गालावर वार केला.यामध्ये जगदाळे हे गंभीर जखमी झाले आहेत.आरोपी बताले याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार,विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे सहायक पोलीस निरीक्षक एम.एस.पाठक यांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमी सचिन जगदाळे यांना तातडीने खासगी दावाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.