एकाच कुटुंबातील लोकांनी केली आत्महत्या.
एस.के.24 तास
अहमदनगर : जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने बदनामीच्या भीतीने एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात मागील काही दिवसांत तीन मृतदेह आढळून आले होते. १८ जानेवारीला दुपारी एका महिलेचा पहिला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर २० जानेवारीला एका पुरुषाचा तर २१ जानेवारीला पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
या महिलेकडून मिळालेल्या मोबाईलवरुन अधिक तपास केला असता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मोहन उत्तम पवार यांचं हे कुटुंब असल्याची माहिती मिळाली. मोहन उत्तम पवार (४८) त्यांची पत्नी संगीता मोहन पवार (४५) मुलगी राणी शाम फुलवरे (२५), जावई श्याम फुलवरे (२८) अशी या चार मृतांची नाव असून हे सर्वजण १७ जानेवारीला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.
यावेळी पोलिसांना या कुटुंबीयांसोबत तीन लहान मुले असल्याचीही माहिती मिळाली. त्यावरुन २३ आणि २४ जानेवारीला नदीपात्रात शोधमोहिम राबवण्यात आली. अखेर आज या तिन्ही मुलांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले. या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वांचा बुडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र त्यानंतरही पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहतं असल्याचं भोईटे यांनी सांगितलं.
दरम्यान, मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोहन पवार यांना एकूण तीन अपत्य आहेत. त्यापैकी मुलगी राणी हिचा श्याम फुलवरेंशी विवाह झाला होता. तर अमोल आणि राहुल ही दोन मुलं आहेत. यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो तर राहुल पुण्यामध्ये असतो. अमोल याने काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातील एक विवाहित मुलगी पळवून आणली होती. त्यामुळे पवार कुटुंबीय प्रचंड तणावात होते. नात्यातलीच मुलगी असल्याने समाजात आपली बदनामी होईल. कोणत्याही परिस्थितीत या मुलीला तिच्या घरी सोडून ये, नाहीतर आम्ही जीव देऊ,असे सांगूनही अमोल याने मुलीला परत पाठवले नाही.
शेवटी मोहन पवार यांनी पुण्यात राहणारा मुलगा राहुल याला फोन करून सांगितले की आमची बदनामी होते आहे,आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही. अमोलने जर मुलीला सोडले नाही तर सर्वजण जीव देणार आहोत. त्यानंतर सर्व कुटुंबीय घराबाहेर पडले. त्यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून येऊ लागले. दरम्यान दोन दिवसापूर्वीच पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर या सर्वप्रकरणाचे गुढ उकललं आहे.