नवी मुंबई महानगर पालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध कला,क्रीडा स्पर्धांना उत्साही प्रतिसाद.
नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे
नवी मुंबई : महानगरपालिकेचा 31 वा वर्धापन सभारंभ दि. 1 जानेवारी 2023 रोजी असून या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील रांगोळी व पाककला स्पर्धा नुकत्याच महापालिका मुख्यालयात संपन्न झाल्या.
प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.नितीन नार्वेकर यांच्या शुभहस्ते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांच्या उपस्थितीत, पाककला स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. 29 महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या पाककृती आकर्षक पध्दतीने सादर केल्या. भारती विदयापीठ कॅटरींग महाविदयालयाचे प्राध्यापक श्री. आदित्य जोशी व श्री हर्षल अठन्नीकर यांनी स्पर्धा परीक्षण केले.
रांगोळी स्पर्धेमध्ये 11 महिला कर्मचा-यांनी सहभागी होत आकर्षक रांगोळी काढल्या. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उप आयुक्त श्री. नितीन नार्वेकर, श्री. दादासाहेब चाबुकस्वार, श्री. सोमनाथ पोटरे, श्री. अनंत जाधव, श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी रांगोळयांची पाहणी करत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. सुप्रसिध्द रंगावलीकार श्री. श्रीहरी पवळे यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले.
बुध्दीबळ स्पर्धेमध्ये 30 पुरुष कर्मचारी आणि 16 महिला कर्मचारी तसेच कॅरम स्पर्धेमध्ये 114 पुरुष कर्मचारी व 52 महिला कर्मचारी यांनी सहभागी होत हे उपक्रम यशस्वी केले. अतिरिक्त आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले यांनी या प्रसंगी स्पर्धास्थळी भेट देत स्वत: कॅरम खेळून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे,आपतकालीन व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम.मंगला माळवे,महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनीही स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
दैनंदिन कार्यालयीन कामकाज करीत असताना अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत हे उपक्रम यशस्वीरित्या संपन्न होत आहेत.