जिल्हावासियांनी दिलेले प्रेम न विसरणारे - बंडोपंत बोढेकर. ★ श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने ग्रामगीताचार्य बोढेकर यांचा भावपूर्ण सत्कार.

जिल्हावासियांनी दिलेले  प्रेम न विसरणारे - बंडोपंत बोढेकर.


★ श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने ग्रामगीताचार्य बोढेकर यांचा भावपूर्ण सत्कार.


एस.के.24 तास


गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हे अखिल मानव जातीला निष्काम सेवेचा मंत्र देते.समूहाच्या सहकार्याने समूहाचा विकास हा मंत्र जनमानसात रुजणे  हे महत्त्वाचे आहे. या महान कार्याचा मंत्र जपत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी  व्यवसाय प्रशिक्षण  , वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, सामाजिक सेवा कार्यात योगदान दिले,हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लेखामेंढा चे थोर समाजसेवी डॉ. देवाजी तोफा यांनी केले. 

अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने श्रीगुरुदेव सामुदायिक प्रार्थना मंदिर सभागृहात आयोजित सत्कार व निरोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. देवाजी तोफा बोलत होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वसा येथील थोर समाजसेवक  रवीजी भुसारी,अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ.शिवनाथजी कुंभारे,सत्कारमूर्ती बंडोपंत बोढेकर विचार पिठावर आसनस्थ होते. तर श्रीक्षेत्र मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकांत लेनगुरे, ग्रंथमित्र प्राचार्य भाऊराव पत्रे,पंडित पुडके, दलितमित्र नानाजी वाढई,केशव दशमुखे गुरुजी, श्रीकांत धोटे,अरविंद पाटील वासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सामुदायिक प्रार्थनेनंतर झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित पुडके यांनी केले.याप्रसंगी रवीजी भुसारी म्हणाले, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी जिल्ह्यात लोकसहभागातून विविध उपक्रम राबवत आपल्या कार्याचा जनमानसावरती  ठसा उमटवला.त्यांनी कायम शिक्षणाशी नाते जोडून ठेवले. शिक्षणक्षेत्र हे पवित्र क्षेत्र असून त्या क्षेत्राशी ते  प्रामाणिक  राहिले.

या भागातील विद्यार्थ्यांसाठी  व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन,व्यसनमुक्ती,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास विषयक कार्य यात विशेषत्वाने लक्ष दिले,हे सेवाकार्य अनुकरणीय आहे, असे ते म्हणाले.डॉ.शिवनाथजी कुंभारे याप्रसंगी म्हणाले की,श्री.बोढेकर यांनी आपला साप्ताहिक सुट्टीचा वेळ  साहित्य,सायकल चालवा चळवळ अभियान, पर्यावरण जनजागृती, साहित्य संशोधन कार्यामध्ये व्यतित केला.त्यांनी सदैव स्वतःला विद्यार्थ्यांस  जोडून घेतले. एकंदरीत ते प्रेरक व्यक्ती ठरलेले आहेत,असे ते म्हणाले. 

सत्कारमूर्ती बंडोपंत बोढेकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात त्यांना मिळालेले प्रेम, त्यांनी केलेली शैक्षणिक सेवा ,राष्ट्रसंतांच्या विचारांचा वैज्ञानिक दृष्टिकोन , साहित्य लेखन यावर प्रकाश टाकत येथील जनतेने दिलेलं प्रेम सदैव माझ्या स्मरणात राहील असे भावनिक उत्तर याप्रसंगी दिले.या कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे,पत्रकार उदय धकाते,विष्णू नागमोती,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर,ग्रंथमित्र भाऊराव पत्रे आदींनी समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात कर्मयोगी डॉ. शिवनाथजी कुंभारे अमृत महोत्सवी वर्ष कार्यसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.सदर पुरस्कार ग्रंथमित्र भाऊराव पत्रे,अरविंद पाटील वासेकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे केशवराव दशमुखे,सुखदेव वेठे या पाच व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले . राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !