मॅजिक मधील विद्यार्थी संयुक्त परीक्षेत राज्यातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून पहिला.
एस.के.24 तास
चिमुर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी मॅजिक अध्ययन केंद्रातील विद्यार्थी राहुल जांभुळे यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मॅजिक उपक्रमाचे हे फार मोठे यश असून या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी राहुलचा सत्कार करत आनंद व्यक्त केला.
राहुल जांभुळे हा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील अतिशय दुर्गम असलेल्या कोरंबी या गावचा रहिवाशी असून त्याचे आई वडील चंद्रप्रभा ऋषी जांभुळे अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत. राहुलचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर महाविद्यालय, नागभीड या महाविद्यालयात त्याने पूर्ण केले. त्यानंतर राहुलने पदवीला असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा 2 वर्ष पुण्यात राहून त्याने स्पर्धा परीक्षेचा स्वतः अभ्यास केला. नंतर त्याला भिसी येथील "मॅजिक" या मोफत निवासी अध्ययन केंद्रामध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या भोजन, निवास आणि वाचनालयाची मोफत व्यवस्था मॅजिक परिवाराच्या वतीने करण्यात आली.
नियोजनबद्ध सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर राहुलने हे यश खेचून आणले. या त्याच्या यशाचा गौरव करण्यासाठी मॅजिकमध्ये अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री रमेश कुमार गजभे यांच्या हस्ते राहुलचा सत्कार करण्यात आला. सोबतच भविष्यात मॅजिक मधून अनेक विद्यार्थ्यांच्या प्रशासना सहभाग वाढावा यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. महत्त्वाचे म्हणजे राहुलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा सुध्दा उत्तीर्ण केलेली असून तो मुलाखतीसाठी पात्र झालेला आहे.
ब्राईट एज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या मॅजिक उपक्रमामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 30 आदिवासी विद्यार्थ्यांना निवास भोजन आणि वाचनालय 2019 पासून मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.याचा उपयोग राहुलला झाल्यामुळे त्याने मॅजिक परिवाराचे आभार मानले. तसेच या यशाचे श्रेय आई-वडील, काका केशव जांभुळे, शिक्षक वृंद, तसेच मॅजिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांना व विद्यार्थी संघटनेला दिले.