रामनगर श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंताचा ५४ वा पुण्यतिथी कार्यक्रम ★ व्यक्तिच्या उच्च परमार्थ प्रयोजनासाठी सामुदायिक प्रार्थना - बंडोपंत बोढेकर

रामनगर श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंताचा ५४ वा  पुण्यतिथी कार्यक्रम


★ व्यक्तिच्या उच्च परमार्थ प्रयोजनासाठी सामुदायिक प्रार्थना - बंडोपंत बोढेकर


एस.के.24 तास


गडचिरोली : थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विविध वैचारिक कार्यक्रमातून राष्ट्रसंतांच्या  साहित्य  विचारांच्या चैतन्यमय  लहरी  जनमनात पसरतात. त्यामुळे समाज जागृतीचे मोठे काम घडून येते . अध्यात्म या विषयांपासून कोणीही वंचित राहू नये आणि आपल्यात सातत्याने सुधारणा होत राहावी याकरिता राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना प्रणाली श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून सुरू केली.  अर्थात व्यक्तीच्या उच्च परमार्थ प्रयोजनासाठी ही सामुदायिक प्रार्थना असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.  अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ रामनगर शाखेच्या वतीने राष्ट्रसंतांचा ५४  वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रार्थना मंदिरात सुरू झालेला आहे. त्यानिमित्ताने  झालेल्या सामुदायिक प्रार्थनेप्रसंगी श्री बोढेकर बोलत होते. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवनाथजी कुंभारे,  पंडित पुडके, अरविंद पाटील वासेकर, दलित मित्र नानाजी वाढई, मुख्याध्यापक रामकृष्ण ताजणे ,  योगतज्ञ विनायक  साळवे (बल्लारपूर),  कवयित्री सौ. भिवराबाई आत्राम (कवडजई)  आदी मान्यवर मंडळी  प्रामुख्याने उपस्थित होती.  बंडोपंत बोढेकर पुढे म्हणाले की , चराचरात रममाण असलेल्या श्रीगुरुदेवाच्या अमर ज्योतीचे ज्ञान आम्हास व्हायला पाहिजे,  त्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना आहे. ही अमरज्योत  तेवत ठेवणे म्हणजे आपल्या आत्म्याची अखंड स्थिती अनुभवणे  होय. हा अनुभव ज्याला येतो, त्यालाच ज्ञान प्राप्त झाले असते. ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला जगाचे भान येते आणि म्हणून ज्ञानी माणूस हा रिकामा कधीच दिसणार नाही . त्याला सामुदायिक प्रार्थनेतून आपल्याला व्यापक व्हावे लागेल तेव्हाच जनसेवा करण्यासाठी आपल्याला आत्मबळ मिळेल. अंतरंगात  आनंदभान  आपल्या मध्ये यावं याकरिता प्रार्थनेचा मूळ उद्देश सांगितला गेलेला आहे,  असेही ते पुढे म्हणाले.  प्रथमतः त्यांचे स्वागत शाखेचे अध्यक्ष सुरेश मांडवगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामकृष्ण ताजने गुरुजी यांनी केले.  कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !