वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात का वाढतो आहे मानव - वन्यजीव संघर्ष ?
एस.के.24 तास
चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दोन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाघाने हल्ला करून अनेक निष्पापांचे बळी घेतले असतानाच ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथे वाघाने हल्ला करीत आणखी एका वृद्धाचा जीव घेतला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. तुकाराम पानसे (७५) असे मृताचे नाव आहे.लाखापूर येथील उत्तर ब्रम्हपुरी वनपिरक्षेत्रातील सायगाटा बिटातील तुकाराम पानसे हे सरपण आणण्यासाठी जंगलात गेले होते. सकाळपासून घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने पानसे कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दररोज अशा घटना घडत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष असून वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिवाळीच्या दोन दिवसाअगोदर वाघाने पाच दिवसात पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
वाघाच्या हल्ल्याची कारणे : -
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाघाचा वावरण्यासाठी अधिवास क्षेत्र अपुरे पडत आहे. तसेच एका वाघाच्या अधिवास क्षेत्रात दुसरा वाघ सहसा जात नाही. गेल्यास त्यांची दोघांची झुंज होवून एक वाघ दगावल्याच्या घटनाही समोर आल्या आहे. त्यामुळे वाघांन अधिवास क्षेत्र अपुरे पडत असल्यामुळे वाघ व वन्यजीव हे मानवी वस्तीकडे येवू लागले आहे.मानव-वन्यजीव संघर्ष होवून निष्पाप नागरिकांचा बळी जातो.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपूरातील वाघांना इतरत्र हलविण्याशिवाय पुसरा पर्याय सद्या तरी वनविभागाकडे असल्याचे दिसून येत नाही. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.